
संगीत रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार ज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत म्हणजे संगीत रंगभूमीवरील तपस्वी रत्न होते. त्यांच्या निधनाने दोन्ही क्षेत्रांची हानी झाली आहे. देवाघरचे ज्ञात कुणाला, नको विसरू संकेत मिलनाचा, पूर्वेच्या देवा, तुझे सूर्यदेव नाव, हे आदिमा, हे अंतिमा, देवा तुझा मी सोनार, मयुरा रे फुलवीत ये रे पिसारा, गुंतता हृदय हे, राधा धर मधु मिलिंद, श्रीरंगा… कमलाकांता, प्रथम तुज पाहता यांसारखी कितीतरी नाटय़गीते, भक्तिगीते आणि चित्रपटगीते त्यांनी आपल्या दमदार, खडय़ा आवाजातून लोकप्रिय केली. 1960 नंतरच्या मराठी प्रेक्षकांना पुन्हा संगीत रंगभूमीकडे खेचून आणले असेल तर ते कामतांनी. गायन आणि अभिनय क्षेत्रात तेवढय़ाच ताकदीचे प्रभुत्व त्यांनी या सुवर्णकाळात गाजवले, सिद्ध केले. रामदास कामत यांना बृहन्महाराष्ट्र-महाराष्ट्रातील दुवा समजले पाहिजे. 18 फेब्रुवारी 1931 रोजी गोव्यात म्हापसा येथे जन्मलेल्या कामतांना संगीताचे प्राथमिक धडे वडील बंधू उपेंद्र यांच्याकडे घेतले. पुढील वाटचालीत पं. गोविंद बुवा अग्नी, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे नाटय़ शिक्षण घेतले तर नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार हे त्यांचे अभिनयातले गुरू होते. संगीताचा गाढा अभ्यास असलेल्या कामतांनी धि गोवा हिंदू असोसिएशन या नाटय़संस्थेच्या माध्यमातून संगीत संशयकल्लोळ या नाटकाने संगीत रंगभूमीचा श्रीगणेशा केला. नाटकातून भूमिका करीत असताना त्यांना अनेक दिग्दर्शकांचे मार्गदर्शन लाभले. मुंबईत महाविद्यालयात असताना त्यांना नाटकात काम करण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्या मराठीवर कोकणीचा प्रभाव असल्याने त्यांना संधी नाकारण्यात आली. नंतरच्या काळात ज्येष्ठ समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी मराठी शिक्षणाचे धडे घेतले. 1964 साली प्रा. वसंत कानेटकर लिखित संगीत मत्स्यगंधा रंगभूमीवर आले. या नाटकामुळे कामत यांना मोठी ओळख मिळाली, एवढेच नाही तर आपल्या अभिनय आणि गायनाने ते घराघरांत पोहोचले. त्यांची गायक व अभिनेता अशा प्रवासाची वाटचाल बहुआयामी होत गेली. कामत यांनी संगीत शारदा, सौभद्र, मानापमान, एकच प्याला, मंदारमाला, होनाजी बाळा अशा 18 संगीत नाटकांमधून गायक, अभिनेता म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाची अमीट छाप सोडली. कीर्ती शिलेदार या गायिका आणि अभिनेत्री त्यांच्यासोबत शारदा (शारदा), संशयकल्लोळ (रेवती), मानापमान (भामिनी) या संगीत नाटकांत सहकलावंत होत्या. विशेष म्हणजे कामत, कीर्ती यांच्या मातोश्री जयमाला शिलेदार यांच्यासोबत मानापमानमध्ये होते. रामदास कामत यांच्या अभिनय आणि गायन क्षेत्राच्या प्रवासाविषयी कीर्ती शिलेदार म्हणतात, ‘‘कोणत्याही नाटकात कामत यांची रंगमंचावरील एण्ट्रीच दमदार असायची. संगीत नाटकात प्रवेशालाच टाळय़ा घेणारे ते अभिनेते होते. त्यांची शिस्त आणि दमदार, खडा आवाज ही त्यांची ओळख होती. कामत हे रंगभूमी गाजवणारे व पल्लेदार आवाजाची देणगी लाभलेले कलावंत होत.’’ कामत यांना गोपीनाथ सावकार, मो. ग. रांगणेकर, मास्टर दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर अशी नामवंत आणि एकापेक्षा एक श्रेष्ठ दर्जाची दिग्दर्शक मंडळी लाभली. रामदास कामत यांच्यासंदर्भात एक आठवण सांगताना ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर म्हणतात, ‘‘बा. भ. बोरकर जन्मशताब्दीच्या वेळेला सा. विवेकतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात कामत बोरकरांच्या कविता गात, अरुण ढेरेही बोरकरांच्या कविता गायन करीत असत आणि हे सुरू असताना मी चित्र काढत असे. पहिला कार्यक्रम मुंबईत झाला. तो एवढा उत्तम झाला की, गोव्यात त्याचे चार प्रयोग झाले आणि महाराष्ट्रात प्रमुख शहरात हे सादरीकरण गाजले. कामत म्हणजे उमदे, साधे, शिस्तशीर व लोभस असे व्यक्तिमत्त्व होते.’’ कामत यांनी नाटय़संगीतासह चित्रपटगीत, भावगीत गायले, त्यातील 65 गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांच्या निधनाने संगीत-नाटक रंगभूमीचा सुवर्णकाळ बघितलेले एक तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
- प्रशांत गौतम्नुस्



























































