
दुबईच्या विमानतळावरून हिंदुस्थानात येणाऱया दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. ही दोन्ही विमाने एकाच धावपट्टीवर समोरासमोर आली होती. एटीसीने सतर्कता दाखवत एका विमानाला मुख्य धावपट्टीवरून हटवत टॅक्सीवेवर जाण्यास सिग्नल दाखवला. त्यावर वैमानिकानेही प्रसंगावधान राखत विमान धावपट्टीवरून बाजूला घेतले. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. दरम्यान, एमिरेट्स एअरलाईन्सने या घटनेच्या सखोल चौकशीचा आदेश दिला आहे.
ईके-524 हे विमान 9 जानेवारीच्या रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी दुबईतून हैदराबादसाठी टेक ऑफ घेणार होते, तर याचदरम्यान ईके-568 हे विमान दुबईतून बंगळुरूला जाण्यासाठी उड्डाण घेणार होते. या विमानांच्या टेकऑफमध्ये पाच मिनिटांचे अंतर होते. परंतु हैदराबादच्या विमानाने टेकऑफची तयारी केली, त्यावेळी क्रू मेंबर्सना त्याच धावपट्टीवर दुसरे विमान वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे दिसले. याबाबत तातडीने एअर ट्रफिक कंट्रोलला (एटीसी) माहिती देण्यात आली. त्यावर एटीसीने हैदराबादचे विमान धावपट्टीवरून हटवून टॅक्सीवेवर घेऊन जाण्याची सूचना केली. त्यानुसार वैमानिकाने विमान बाजूला घेतल्याने संभाव्य टक्कर टळली. एटीसीच्या सतर्कतेमुळे शेकडो विमान प्रवाशांचे प्राण वाचले. दरम्यान, एमिरेट्स एअरलाईन्सने या घटनेची सखोल चौकशी सुरु केली असून संबंधित क्रू मेंबर्सविरुद्ध अंतर्गत चौकशीचा आदेश दिला आहे.






























































