निसर्गजागर : जैवविविधतेत आपण कुठे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> यादव तरटे पाटील

प्राणवायू, पाणी व अन्न देणाऱ्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कायदा यायला 2002 हे वर्ष उजाडले. जैवविविधता संवर्धन कायदा येऊन आता तब्बल 19 वर्षे झाली. मात्र आजही प्रश्न तेच आहेत. जैवविविधता संवर्धनाच्या व कायद्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांत काही सकारात्मक बदल घडून आले असले तरी आजही अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत.

जगातील महाजैवविविधता केंद्रांपैकी एक असलेल्या समृद्ध सह्याद्रीच्या रूपाने आपल्या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. समृद्ध जैवविविधतेचा वाटेकरी असलेला प्रदेश म्हणजे आपला महाराष्ट्र! युनोच्या जागतिक महाजैवविविधता भूभागातील हिमालयीन प्रदेश, हिंदुस्थान-म्यानमारदरम्यानचा प्रदेश व पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्री हे हिंदुस्थानातील तीन महत्त्वपूर्ण महाजैवक्षेत्र आहेत. जल, जंगल, जमीन व जैवविविधता यांचा सुंदर मिलाप म्हणजे महाजैवविविधता केंद्र होय. महाजैवविविधता केंद्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी त्या भागात कमीतकमी दीड हजारहून अधिक प्रजाती या स्थानविशिष्ट (Endemic) प्रजाती असणे आवश्यक आहे. जगाच्या केवळ 2.42 टक्के क्षेत्रफळ असलेल्या हिंदुस्थानात जगाच्या एकूण जैवविविधतेच्या तब्बल 8 टक्के जैवविविधता एकटय़ा हिंदुस्थानात आढळते. जैवविविधतेच्या बाबतीत जगात पहिल्या 10 महत्त्वाच्या देशांत आपल्या हिंदुस्थानचा क्रमांक लागतो. आजमितीस हिंदुस्थानात एकूण वनस्पती 5000, सस्तन प्राणी 397, पक्षी 1284, सरपटणारे प्राणी 478, उभयचर प्राणी 312, मत्स्यवर्गीय प्राणी 2641, कीटक 58000 पैकी फुलपाखरे 1502 व 1718 कोळ्यांच्या प्रजाती आढळून येतात. महाराष्ट्रात एकूण 127 सस्तन प्राणी, 630 पक्षी, 540 फुलपाखरे, 700 च्यावर कोळ्यांच्या प्रजाती, 47 प्रकारचे चतूर, शंभरच्या वर सरीसृप आढळून येतात. एकूण 165 मासे व पन्नासच्या वर उभयचर प्रजाती आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातही यात कुठेच मागे नाही. मात्र समृद्ध अशा जैवविविधतेला अनेक धोकेही आहेतच. प्राणवायू, पाणी व अन्न देणाऱ्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कायदा यायला 2002 हे वर्ष उजाडले. जैवविविधता संवर्धन कायदा येऊन आता तब्बल 19 वर्षे झाली. मात्र आजही प्रश्न तेच आहेत. जैवविविधता संवर्धनाच्या व कायद्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांत काही सकारात्मक बदल घडून आले असले तरी आजही अनेक आवाहने आपल्यासमोर आहेत. मानवप्राणी स्वतः जैवविविधतेचा हिस्सा असूनही जनसामान्यांसाठी जैवविविधता हा विषय अजूनही नवखाच आहे, हा माझा आजवरचा अनुभव आहे. कारण पर्यावरण शिक्षण क्षेत्रात माझ्या दोन दशकांच्या अनुभवामध्ये जैवविविधता ही संकल्पना माहिती असणारे कमी लोक सापडले. म्हणून जैवविविधता संवर्धनासाठी व्यापक जनजागृतीची खऱ्या अर्थाने गरज आहे. भित्तिपत्रके, लेख, बातम्या, कार्यशाळा या शहरी भागात केंद्रीभूत झाल्या असतानाच त्या ग्रामीण जीवनातही अधिक मिसळणे गरजेचे आहे. उलटपक्षी ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात जैवविविधता आढळते. सबब अशा ठिकाणी याची अधिक गरज आहे.

जैवविविधता संवर्धन व जतन करण्यासाठी सन 2002 मध्ये हिंदुस्थानात जैवविविधता कायदा-2002 लागू करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना या कायद्याची अंमलबजावणी व नियमन करणे बंधनकारक आहे. एकूणच या कायद्यांतर्गत संपूर्ण जैवविविधतेची नोंदणी, संरक्षण व स्थानिकांसाठी शाश्वत उपयोग व संवर्धन बंधनकारक आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी यासकट सर्व नोंद झालेल्या व नव्याने नोंदल्या जाणाऱया प्रजातींची संपूर्ण माहिती जैवविविधता कायदा 2002 अंतर्गत ‘लोक जैवविविधता नोंदवही’च्या माध्यमातून ठेवणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्हा परिषदा, 355 पंचायत समित्या, 28,813 ग्रामपंचायती तसेच 26 महानगरपालिका, 224 नगरपालिका व 110 नगर पंचायतींमध्ये या कायद्यान्वये ‘जैवविविधता व्यवस्थापन समित्या’ (Biodiversity Management Committee) स्थापन करणे बंधनकारक आहे. इतकेच नाही, तर त्याअंतर्गत ‘लोक जैवविविधता नोंदवही’ (Public Biodiversity Register) तयार करणेसुद्धा बंधनकारक आहे. म्हणजेच यातून प्रत्येक स्तरावर असलेल्या जैविक विविधतेची लोकांना ज्ञान व जाणीव होईल. स्थानिक स्तरावरील नागरिकांना याचा मोठय़ा प्रामाणात उपयोग करता येईल. शिकार व प्राणी अवयव बेकायदेशीर व्यापार, अधिवास अवनती, अधिवासाचे विखंडन, परदेशी जीव प्रजातींचा प्रवेश, विशिष्ट प्रजातींची हत्या, कीटकनाशकांचा वापर आदी धोक्यापासून जैवविविधता सुरक्षित कशी ठेवता येईल याचेही ज्ञान होईल. मात्र यासाठी आपल्याला अनेक दशके वाट पाहावी लागली. जैवविविधता संवर्धन कायद्याला तब्बल 16 वर्षे झाल्यावर सन 2017 मध्ये महाराष्ट्रात बीएमसीचे गठन व्हायला सुरुवात झाली. लोक जैवविविधता नोंदवह्या तयार झाल्या असल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. मात्र या लोक जैवविविधता नोंदवह्यांची केवळ संख्यात्मक प्रगती झाल्याचे चित्र आहे. या वह्या अजूनही गुणात्मक दृष्टीने अजूनही कितीतरी दूर आहेत.

महाराष्ट्रात जैवविविधता संवर्धन कायद्याचे गठन होताच सुरुवातीला अव्वल असणारे आपले राज्य अचानक मागे पडले. वास्तविक मध्य प्रदेश व केरळसारखी राज्य गुणात्मक व संख्यात्मकरीत्या खूप पुढे निघून गेले आहे. महाराष्ट्र याबाबतीत उपराच ठरला आहे. मध्य प्रदेशसारख्या राज्यात लोकसहभागातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आवळा, बेल. मुरुडशेंग, मुसळीसारख्या औषधी वनस्पतीचे संवर्धन स्थानिकांच्या सहभागाने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कायद्यांतर्गत मध्य प्रदेशमध्ये जून 2017 ला हिंदुस्थानातील पहिला गुन्हा नोंदविण्यात आला. हिमाचल प्रदेशमधील एका पंपनीच्या नावाने जैवविविधता कायदा 2002 अंतर्गत कलम 7 व 51 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला. स्थानिक प्रजातींचे स्थानिकांनीच संवर्धन करावे व त्याचा शाश्वत उपयोगसुद्धा घ्यावा असा या कायद्याचा हेतू आहे. या कायद्याच्या कलम 7 नुसार मध्य प्रदेशमधील स्थानिक शेतकऱयांना एकूण 95 टक्के शुल्काचा वाटा मिळण्याचे प्रावधान यावेळी करण्यात आले. दरवर्षी 20 मे ‘जागतिक जैवविविधता दिन’ सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना साजरा करणे आवश्यक असताना आपल्या राज्यात मात्र याचा कायम विसर पडताना आपण पाहतो आहे. केवळ वन व महसूल विभागामार्फत जैवविविधता दिन साजरा केल्या जात असतानाच महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची या ठिकाणी कसरत होताना दिसत आहे. यासाठी ‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ’ अधिक लोकाभिमुख होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा जैवविविधता समित्या आणि सर्व जैवविविधता व्यवस्थापन समित्या सक्षम होणे गरजेचे आहे. स्थानिक समित्यांच्या कागदावरील बैठका आणि पदाधिकारी यांच्याकडून व्यापक दृष्टिकोन ठेवून शाश्वत कामकाजाची गरज आहे.

राजकीय सकारात्मक दृष्टिकोन, प्रशासकीय प्रबळ इच्छाशक्ती, स्वयंसेवी संस्थांनी निःस्वार्थ भाव ठेवून व स्थानिक वन्य जीव अभ्यासकांचा यात सहभाग वाढविणे आवश्यक आहे. तरच ही समृद्ध जैवविविधता टिकविणे शक्य होईल. महाजैवविविधता केंद्र असलेल्या महाराष्ट्राची या अंगाने प्रगती होणे आवश्यक आहे. स्थानिक लोकांना जैवसंपत्तीचे व्यापक हक्क व अधिकार तसेच शाश्वत उपयोग बहाल करणारा हा कायदा आहे. वन्य जीव संवर्धन तसेच लोकांच्या अस्तित्वाशी व जीवनाच्या हिताशी निगडित असलेल्या या कायद्याचा वनवास लवकर संपेल अशी आपण आशा करूया.

(लेखक महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य आहेत)
– [email protected]
– [email protected]