हिंदुस्थानी क्रिकेटच्या भल्यासाठी विराटने अहंकार सोडून युवा नेतृत्वाखाली खेळावे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला विराट कोहली याची संघनिष्ठा आणि खेळाबद्दलच्या प्रेमाबद्दल कोणीही शंका घेऊ शकणार नाही.पण आता कर्णधारपद सोडल्यावर त्याने आपला अहंकारही सोडून टीम इंडियाच्या भल्यासाठी नव्या कर्णधाराला मदत करावी.एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून आपण विराटला गमावणे योग्य ठरणार नाही. आता विराटने  एक खेळाडू म्हणून मुक्तपणे आपला नैसर्गिक खेळ करून संघाला पुन्हा क्रिकेटजगतात टॉपवर न्यावे ,असा वडिलकीचा सल्ला हिंदुस्थानला पहिला विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीला दिला आहे.

”महान क्रिकेटर सुनील गावसकर माझ्या कर्णधारपदाखाली  खेळले. मी श्रीकांत आणि अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळलो. मला कधीच अहंकार नव्हता. विराटलाही आपला अहंकार सोडून युवा क्रिकेटपटूच्या हाताखाली खेळावे लागेल. त्यामुळे त्याला आणि हिंदुस्थानी  क्रिकेटला मदत होईल. विराटला नव्या कर्णधाराला मार्गदर्शन करावे लागणार आहे. एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराटला आपण गमावू शकत नाही.”अशी भावना माजी विश्वविजयी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केली.

अलीकडच्या काळात तो खूप चिंतेत दिसायचा, ”कर्णधारपद सोडण्याच्या विराटच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जेव्हापासून त्याने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हापासून तो अत्यंत वाईट काळातून जात होता. अलीकडच्या काळात तो खूपच चिंतेत दिसला. आता तो खूप दडपणाखाली असल्याचे दिसत आहे. मुक्तपणे खेळण्याचा त्याचा निर्णय असू शकतो.”असे कपिल एका इंग्रजी सायंदैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.