
पुणे-सोलापूर महामार्गावर मोडनिंब येथील हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ टेम्पोतून 42 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा व दहा लाखांचा टेम्पो असा 52 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी टेम्पोच्या चालकासह मालकावर टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चालकाला अटक करण्यात आली आहे.
टेम्पोमालक महकदिप बलदेव सिंग (रा. कल्पतरू इस्टेट, जवळकरनगर, पिंपळे गुरव, पुणे) आणि चालक तुकाराम हणुमंत वस्के (वय 32, रा. आलूर, ता. उमरगा, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मोडनिंब येथील हिंदुस्थान पेट्रोल पंपावर एक टेम्पो दुरुस्तीसाठी थांबला असून, त्यात गुटखासदृश्य पानमसाला व तत्सम पदार्थ असल्याची माहिती पुणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) ए. वाय. इलागेर यांना मिळाली होती. त्यामुळे सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ व ए. वाय. इलागेर या दोघांनी मोडनिंब येथे येऊन बंद असलेल्या टेम्पोच्या चालकास टेम्पोतील मालाविषयी विचारले.
चालकाने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा असल्याचे आढळून आले. या टेम्पोमध्ये राजनिवास सुगंधित पानमसाला 85 मध्ये दोनशे रुपये किमतीची 17 हजार पाकिटे एकूण किंमत 34 लाख रुपये तसेच एक्सएल 61 जाफरानी जर्दा 17 पोत्यांमध्ये 50 रुपये किमतीची 17 हजार पाकिटे एकूण किंमत साडेआठ लाख रुपये असा एकूण 42 लाख 50 हजार रुपयांचा माल अन्न सुरक्षा अधिकाऱयांनी पकडला. तसेच, दहा लाख रुपये किमतीचा टेम्पो व चालक तुकाराम वस्के याला टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी नंदिनी हिरेमठ यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले तपास करीत आहेत.




























































