
घराबाहेर वाळत घातलेले कपडे अचानक गायब कसे होतात, या प्रश्नाने कोल्हापुरातील न्यायाधीशांना भंडावून सोडले होते. गेला महिनाभर हा प्रकार सातत्याने होत असल्याने या प्रश्नाची उकल करण्यासाठी त्यांनी घराच्या आवारामध्ये सीसीटीव्ही बसवले होते. या सीसीटीव्ही दृश्यांद्वारे पाळत ठेवत न्यायाधीशांनी सापळा रचून या चोराला पकडण्याचा निर्धार केला होता. त्यांनी न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या चोराला पकडून अखेर पोलिसांच्या हवाली केले.
न्यायाधीशांनी भुदरगड पोलिसांशी संपर्क साधला आणि घराच्या परीसरात सीसीटीव्ही बसवले. सीसीटीव्ही दृश्ये बारकाईने पाहात असताना एक चोर वाळत घातलेल्या कपड्यांच्या दिशेने येतो, कपडे चोरतो आणि भिंतीवरून उडी टाकून धूम ठोकतो असं दिसून आलं होतं. न्यायाधीशांनी या चोराला काहीही करून पकडायचंच असा निश्चय केला होता. त्यांनी यासाठी न्यायालयातील दोन कर्मचाऱ्यांची मदत घ्यायचं ठरवलं होतं. मंगळवारच्या दिवशी न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी मिळून अखेर या चोराला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
सुशांत सदाशिव चव्हाण असं आरोपीचं नाव असल्याचं कळालं आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या सतीश मयेकर यांनी सांगितले की सुशांत हा गारगोटी इथे राहणारा आहे. त्याच्या आईने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. सुशांत लहान असताना त्याच्या डोक्यावर कोणीतरी दगडाने मारलं होतं, तेव्हापासून तो विचित्र वागत आहे. सुशांत भल्या पहाटे उठायचा आणि कपडे चोरायचा, यातही खासकरून तो महिलांचे कपडे चोरत होता असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सुशांतकडे चौकशी केली असता त्याने सांगितलं की तो पहाटे 4 वाजता उठायचा आणि त्यानंतर तो काय करायचा हे त्याला काहीच आठवायचं नाीही.




























































