ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्रकारितेत 50 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे समन्वय संपादक ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे आज निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोना झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला मात्र फुफ्फुसांच्या संसर्गामुळे त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने ते उपचारांना तितकासा प्रतिसाद देत नव्हते. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिनकर रायकर हे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुंबई आवृत्तीचे चीफ रिपोर्टर, ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक, दैनिक ‘लोकमत’ आणि ‘लोकमत टाइम्स’च्या संभाजीनगर आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांना पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषिवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

पत्रकारितेत मोलाचे योगदान देणारा संपादक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पत्रकारितेच्या क्षेत्रात मूल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रुजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढय़ांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रुजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.