
सोलापूर शहरातील जीर्ण शौचालय, पडीक शाळांच्या निविदानंतर आता शहरातील समाजमंदिरे व अभ्यासिकांचा लिलाव होणार आहे. शहरातील एकूण 120 जागांपैकी मुदत संपलेल्या 95 जागा महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भूमी व मालमत्ता विभागाने दिली आहे.
शहरात महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर व्यापाऱ्यांकडून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी त्याच व्यापाऱ्यांना जागा भाडेतत्त्वावर देऊन मनपाचे महसुली उत्पन्न वाढविण्याची शक्कल आयुक्तांनी लढविली. नगरसेवकांनी सुचविलेल्या शहरातील जुनी 26 शौचालय पाडून ती जागा स्वच्छ करण्यात आली. त्यातील 9 जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आली. त्यानंतर शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या 13 शाळा 29 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.
त्यापाठोपाठ महापालिकेच्या जागांवर उभारण्यात आलेल्या अभ्यासिका, समाजमंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कार्यालये थाटली होती. आता मुदत संपलेल्या अभ्यासिक व समाजमंदिरे महापालिकेने ताब्यात घेतली असून, 11 महिन्यांसाठी भाडेकराराकर देण्यात येणार आहेत.
याची निविदा प्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. शहरातील मुदत संपलेली 7 समाजमंदिरे व 38 अभ्यासिका महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्या निविदा काढण्यात येणार आहेत, असे सहायक आयुक्त विक्रम पाटील यांनी सांगितले.
























































