ही वाट एकटीची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

आयुष्यात कोणीतरी हक्काचं असं हवं होतं जे आपलं सुखदुःख निदान ऐकून घेईल, जी व्यक्ती कायम प्रोत्साहित करेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या नात्याला उघडपणे कौतुकाने सांगेल, पण अशी अपेक्षा पूर्ण न होता नातं वेगळ्याच दिशेने जाऊ लागतं अन आपण अनिश्चिततेच्या सावटाखाली जगत राहतो. एकटं आयुष्य जगताना वयाच्या एका टप्प्यानंतर एकाकीपणाची अशी बरीचशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात जी मनाने एकाकी आयुष्य जगत असतात. यापैकी काही लताबाईंसारखी उदाहरणं आहेत ज्यांना एकाकीपणावर उत्तर सापडतं, पण तेही अर्धविरामाच्या रूपात. या नात्यांच्या प्रश्नचिन्हांपुढे बऱ्याच वेळेस चांगलीच दमछाक होते. 

लता (नाव बदलले आहे) या साधारण पन्नाशीच्या. त्यांना वृद्धांबद्दल कमालीची आस्था होती. मुळात सेवाभावी वृत्ती असल्याने कोणीही गरजू दिसल्यास त्या कायमच मदतीसाठी तत्पर असत. त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे माणसं जमवली होती. तसंही लताबाईंना पैशाची ददात नव्हती. एका मोठ्या ऍड कंपनीत त्या एमडी पदावर कार्यरत होत्या. घरही सुखवस्तू असल्याने त्यांना आयुष्यात कसलीच कमतरता नव्हती… एक गोष्ट सोडल्यास!

‘मला हल्ली-हल्ली खूप एकटं आणि उदास वाटायला लागलंय. मी अजूनही सिंगल आहे. घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे लग्न नाही होऊ शकलं. वडील गेल्यानंतर आई आणि मीच आहोत एकमेकींना.’ बोलताना लताबाई थांबल्या. बहुधा वाक्यांची मनातल्या मनात जुळवाजुळव करत असाव्यात. त्यांच्या हातातील पेनाचे टोपण त्या नकळतपणे दोन्ही हातांमध्ये नाचवत होत्या.  ‘तुमच्या आयुष्यात कोणी खास असं आहे का?’ असं विचारल्यावर पटकन त्यांचे पेनाचे खेळ थांबले आणि मंद हसत त्या ‘हो’ म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यातून त्यांची कथा आणि व्यथा उलगडत गेली आणि समोर उलगडला तो आव्हानात्मक असा त्यांचा जीवनपट.

त्यांच्या ‘खास’ मित्राने ‘लिव्ह इन’चा पर्याय लताबाईंजवळ ठेवला होता, पण काहीशा भिडस्त आणि रुढीप्रिय असणाऱ्यांना त्यांना ‘लग्न करणं’ हे महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळे त्या दोघांच्याही नात्याला आजतागायत काही पूर्णत्व प्राप्त होत नव्हतं. ते दोघेही आता वयाच्या पन्नाशीत पोहोचत होते. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही की दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नव्हती.
मात्र एक गोष्ट अशी झाली होती की, लताबाईंच्या या मित्राने त्याच्या दुसऱ्याच एका मैत्रिणीसोबत सहजीवनाला सुरुवात केली होती. तीही लताबाईंना अंधारात न ठेवता. लताबाईंनीही त्यासाठी काही हरकत घेतली नव्हती. ‘आम्ही दोघीही कधी कधी बोलतो फोनवर.’ त्या आता त्यांच्या मनातली खरी सल सांगायला लागल्या. झालं असं होतं की, त्यांच्या मित्राची दुसरी मैत्रीण ही बिनधास्त आणि मोकळ्या विचारांची होती. ती स्वतःला कायम नीटनेटकं ठेवायची. या सर्वांमुळे तिच्या दिसण्या, वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आला होता.

याउलट लताबाई! घरची जबाबदारी आणि अतिविचारी स्वभावाने त्यांना अकाली प्रौढ बनवलं होतं. आता नाही म्हटलं तरी त्यांच्या मनात त्या मैत्रिणीबद्दल थोडी फार असूया तयार झाली आणि ‘हे ऍक्चुअली चांगलं नाही’ असेही विचार त्यांना यायला लागले. यावर अजून एक म्हणजे, त्यांच्या मित्राच्याही बोलण्यातून तिचे कौतुक आणि त्या दोघींची तुलना लताबाईंना जाणवू लागली. त्यांचा मित्र उघडपणे त्यांना ‘किती चुकतेस आणि बोअर आहेस’ असेही शेरे मारू लागला होता.

या सर्वांचा परिणाम असा झाला की, त्या एकाच गोष्टीत अडकल्याने त्या उदास आणि स्वतःबद्दल नकारात्मक होऊ लागल्या. त्यांना स्वतःच्या दिसण्यात, बोलण्यात कमतरता जाणवू लागल्या. ऑफिसमधल्या त्यांच्या कामावरही परिणाम झाला. त्यांना आता आयुष्यात कोणीतरी हक्काचं असं हवं होतं जे त्यांचं सुखदुःख निदान ऐकून घेईल, त्यांचे समुपदेशन घेण्याचे कारण हेच होते, त्यांना त्यांच्या असूयापूर्ण विचारांतून आणि एकंदरीत आयुष्यात आलेल्या अनिश्चिततेची उत्तरं हवी होती. आज अशी बरीचशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत जी मनाने एकाकी आयुष्य जगत आहेत. यापैकी काही लताबाईंसारखी उदाहरणं आहेत ज्यांना एकाकीपणावर उत्तर सापडतं, पण तेही (;) अर्धविरामाच्या रूपात. या नात्यांच्या प्रश्नचिन्हांपुढे बऱयाच वेळेस चांगलीच दमछाक होते. या सर्वांवर तोडगा हवा असेल तर आपल्या ‘स्व’ला जागृत करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आता ‘स्व’ जागा करणं म्हणजे काय? तर

  • स्वतःला प्राधान्य देणं- यात वाईट काहीही नाही किंवा हे स्वार्थीपणाचेही लक्षण नाही. कारण जितकं आपण स्वतःला वेळ देतो तितकं आपण मानसिकदृष्ट्या सक्षम होतो आणि आपण जर सक्षम असू तर आपण आपल्या माणसांकडेही व्यवस्थित लक्ष देऊ शकतो.
  •  अंगभूत गुण ओळखून ते स्वीकारणं – एकदा का हे जमलं की आपल्याला ते गुण वाढवण्यासाठी योग्य त्या दिशेने प्रयत्न करता येतात आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास वाढीस लागतो.
  • स्वतःला आहे तसं स्वीकारणं – यामुळेच मनातील नकारात्मक, अपराधीपणाची भावना निघून जाते आणि आपण मग अधिकाधिक स्वतःचा विकास कसा करता येईल या सकारात्मक दृष्टिकोनाकडे वळतो.
  • छंद जोपासणं – हे चांगल्या मन:स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.                                       लताबाईंच्याही लक्षात आले की, या सगळ्याचा त्यांनी विचार केला होता, पण न्यूनगंडाच्या भावनेतून त्यांनी तो बाजूला सारला होता. पण आता त्यांना काही गोष्टी तशाच सोडून पुढे जायचं होतं. स्वतःला आणि आईला जास्तीत जास्त वेळ द्यायचा होता. स्वतःमधील सर्जनशीलताही जोपासायची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ‘खास नात्यालाही’ एका सुरक्षित अंतरावर ठेवायचं होतं. ज्यामुळे त्यांना व्यवस्थित स्वतःकडे लक्ष देता येणार होतं. लताबाईंना एवढं समजलेलं होतं की, समुद्रकिनाऱयावरची वाळू एका मुठीत जेवढी यायची तेवढीच येणार. जास्त मूठ घट्ट केली तर हातात आहे ती वाळूसुद्धा निसटून जाईल.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
  [email protected]