
>> नरेंद्र बंडबे
साऊथ सिनेमांचं हिंदीतलं गणित हे फक्त अतिरिक्त टेरीटरी राहिलेली नाही, तर ते आता मेन मार्केट झालंय. ‘पुष्पा’च्या यशानं असा विचार करायला भाग पाडलंय. याचं श्रेय साऊथ सिनेमांनी हाताळलेल्या विषयांनाही द्यावं लागेल. साऊथचा सिनेमा हा त्याच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्व अंगानं येतो. शिवाय जात, समाज, लिंगभेद असे विषयही हाताळतो. हीच कारणं आहेत, जी प्रेक्षकांना थिएटर्सपर्यंत खेचून आणतात.
ऐंशीच्या दशकातली सांगोवागी आहे. म्हणे कमल हासन या साऊथच्या स्टारचा हिंदीतल्या अभिनेत्यांनी काटा काढला. त्यात अमिताभ, शत्रुघ्न सिन्हापासून बरेच आघाडीवर होते. वासू-सपनाची लवस्टोरी घेऊन आलेला ‘एक दुजे के लिये’ (1981) गाजला. कमल हासनला हिंदीत मागणी वाढली. त्याला घेतलात तर आम्हाला विसरा, असा दम हिंदी सुपरस्टारने भरण्यात आला. ‘सागर’ (1985) नंतर कमल हासनला हिंदीत काम मिळणं बंद झालं. साऊथमध्ये तो स्टार होताच. तिथं तिकीट खिडकी गाजवलीच, शिवाय सिनेमातले प्रयोग केले. त्यानंतर तो थेट ‘चाची 420’ (1997) सिनेमात दिसला. रजनीच्या बाबतीतही तसंच घडलं, पण ट्रशी (टाकावू) सिनेमांच्या नव्वदच्या दशकात ही साऊथमध्ये रजनी, कमल हासन, नागार्जुन, चिरंजिवी, मामुटीसारख्यांनी आपली टेरीटरी गाजवत ठेवली. ते प्रेक्षक तिकीट बारीवर आणत राहिले. पैसा वसूल इंटरटेन्मेन्ट देत राहिले. प्रोड्युसरला कमवून दिलं. हा सिलसिला त्यांच्या पुढच्या पिढीनं कायम ठेवलाय.
पैसा वसूल हे एकमेव गणित सिनेमा इंडस्ट्रीला लागू पडतं. जो सिनेमा बनवतोय आणि जो पाहतोय असा दोघांचा पैसा वसूल झाला पाहिजे, असं हे थेट गणित आहे. सध्या दक्षिणेतल्या फिल्मस् हेच करतायत. आधी साऊथचा सिनेमा हा फक्त तिकडेच हाऊसफुल व्हायचा, पण ‘पुष्पा’ (2021) या सिनेमानं हा पायंडा मोडला. पुष्पा ‘फ्लॉवर’ राहिला नाही, तर ‘फायर’ झाला आणि हिंदीतही ‘आग लगा दी’. ‘पुष्पा’च्या हिंदी डब्डने रेकॉर्ड कमाई केली. ती ओरिजिनल तेलुगू भाषेपेक्षा कितीतरी जास्त आहे. तेलुगू अभिनेता नागार्जुन म्हणतो, ‘तेलुगू बॉक्स ऑफिसचा विचार केला तर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा हिट म्हणता येईल, पण तो स्मॅश हिट नक्कीच नाही, पण हिंदी डब्ड पुष्पानं रेकॉर्ड मोडला. हे नक्की का आणि कसं घडतं हे पाहावं लागेल?’ आता तर बाहुबलीवाला दिग्दर्शक राजामौलीचा ‘आरआरआर’ (2022) येतोय. त्यात ज्युनियर एनटीआर आणि रामचंद्रन असा डबल धमाका आहे. तो हिंदीसहित साऊथच्या चार भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणारेय. पुष्पानंतर आता आरआरआर पैसा वसूल ठरतोय का हे पाहायला लागेल. त्याआधी साऊथचे हे रावडी सिनेमे का चालतायत हे शोधायला हवं.
साऊथचा सिनेमा म्हणजे मसाला. थेटरात जाताना हे कसं शक्य आहे असा विचार करणारं डोकं बाजूला ठेवयचं. जे काही पडद्यावर घडतंय त्याचा आनंद घ्यायचा. हसायचं, रडायचं, शिट्टय़ा, टाळय़ा वाजवायच्या आणि एन्जॉय करून परत घरी यायचं. इमोशन, ऍक्शन आणि आपसुक थिरकवायला लावणारं संगीत. ‘ढिंच्याक’ असं सर्व काही अलीकडं चाललेल्या साऊथच्या सिनेमांमध्ये होतं. यामुळं तो हिंदी डब्ड असो किंवा मग ओरीजिनल तेलुगू, तामीळ किंवा मल्याळम, प्रेक्षक खेचतोय. हे सत्य आहे.
हिंदीच नव्हे तर सर्वच भाषेतले प्रेक्षक साऊथच्या सिनेमांना गर्दी का करतायत याची काही कारणं टीव्ही इंडस्ट्रीत दडलेत. काही वर्षांपूर्वी हिंदीत सोनी मॅक्स, झी सिनेमा, फिल्मी असे बरेच चॅनल्स आले. ते 24 तास सिनेमा दाखवत. चोवीस तास म्हटल्यावर आता त्यासाठी रसद लागणार. तेव्हा साऊथच्या गाजलेल्या मसाला फिल्म्स डब्ड करून दाखवण्यात आल्या. काल-परवापर्यंत लुंगीवाल्या हिरोंच्या नावानं नाक मुरडणारा हिंदी आणि इतर भाषेतला प्रेक्षक घरात बसून ‘जबरदस्त’ फील करायला लागला. हे फिलिंग पुढे त्याला थेटराकडे घेऊन गेलं. महेश बाबू, रवी तेजा, सुरीया, अल्लू अर्जुन, रामचंद्रन, ज्युनियर एनटीआर हे आपलेही हिरो झाले. साऊथप्रमाणेच हिंदी बेल्टमध्ये त्यांचा फॅन फॉलोइंग वाढला. इथं साऊथच्या सिनेमांना मागणी वाढली. आधी मेट्रो आणि नंतर छोटी-मोठी शहरं त्यांनी काबीज केली.
साऊथचा प्रत्येक सिनेमा हिंदीत चालतोय का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. चालणाऱया सिनेमांची दोन भागात वर्गवारी करता येईल. पहिला साऊथचा स्टार हिरो असलेला आणि दुसरा टीव्ही चॅनल्सवरच्या मसाला फिल्मचा हिरो. तो साऊथच्या स्टार रेसमध्ये मागे असेलही, पण टीव्हीनं त्याचा फॅनफोअर्स वाढवला. या हिंदी डब्ड साऊथ फिल्म चालतायत पाहिल्यावर त्याची एक इकॉसिस्टम तयार झाली. या धंद्यात असलेल्या प्रोडय़ुसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्सला त्यात पैसा दिसू लागला. त्यांनी सिनेमा बनतानाच हिंदी डबिंगचे राईट्स द्यायला सुरुवात केली. आधी हिंदी बेल्टकडे (मुंबईसहित सुमारे 12 राज्ये) एडिशनल टेरीटरी म्हणजेच अतिरिक्त भाग म्हणून पाहिला गेलं. साऊथच्या गाजलेल्या सिनेमांचे हिंदीत रिमेक यायला लागले. वाँटेड, रावडी राठोड या साऊथ रिमेकने सलमान, अक्षयसारखे हिंदी स्टार बॉक्स ऑफिसच्या गणितात अव्वल ठरले. गजनी, दृश्यम, सिंघम, सिम्बासारख्या सिनेमांमधून आमीर खान आणि अजय देवगणसारखे अभिनेते बॉक्स हिट्स देऊ लागले. मग बाहुबलीचा प्रयोग झाला. त्यानंतर कहर केला. कमाईनं कोटी-कोटींची उड्डाणं केली. ती आता पुष्पापर्यंत येऊन पोचलीत. प्रभास हा तेलुगूतल्या स्टार सिस्टममध्ये दुसऱ्या रांगेत होता. तो अचानक पुढे आला. अल्लू अर्जुन, रामचंद्रन, दलकिर सलमानला हक्काचा नवीन प्रेक्षक मिळाला.
साऊथ सिनेमांचं हिंदीतलं गणित हे फक्त अतिरिक्त टेरीटरी राहिलेली नाही तर ते आता मेन मार्केट झालंय. पुष्पाच्या यशानं असा विचार करायला भाग पाडलंय. साऊथचा सिनेमा हा त्याच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्व अंगानं येतो. जात, समाज, लिंगभेद असे विषय हाताळत तो कंप्लिट फॅमिली एंटरटेनर बनतो. हीच कारणं आहेत जी प्रेक्षकांना थिएटर्सपर्यंत खेचून आणतात. साऊथच्या सिनेमांतलं संगीतही एक कारण आहे. आधी एलायराजा, ए आर रहमान ही एक-दोन नावं हिंदी सिनेरसिकांना माहीत होते, पण आता एम. एम. क्रिम, कोटी अशा बऱयाच साऊथ म्युजिशियन्सची गाणी हिंदी प्रेक्षकांच्या तोंडात बसलीयत. डान्स ही जमेचा भाग आहे.
गेल्या 20 वर्षांमध्ये साऊथमधल्या फिल्म इंडस्ट्रीतली स्टार सिस्टम बदललेय. आधी तामीळमध्ये रजनीकांत, कमल हासन, तेलुगूमध्ये चिरंजिवी, नागार्जुन, मल्याळममध्ये मामुटी, मोहनलाल यांनी हिंदुस्थानातले चार राज्ये आणि डायस्पोरा अर्थात परदेशात हिंदुस्थानचे नागरिक जिथं राहतात तो भाग काबीज केला. ते ढेरपोट्या झाले असतानाही चालले. आता साऊथमध्ये सुपरस्टार अभिनेत्यांची एक मोठी लाटच आली. एकदम फिट एन्ड फाईन, शिवाय कूल आणि डॅशिंग. धनुष, सूर्या, अल्लू अर्जुन, महेश बाबू, ज्युनियर एनटीआर हे फिट एन्ड फाईन, डान्सर आणि रोमांटिक असं सर्व काही पॅकेज डिल घेऊन आले. साऊथची ही नवीन पिढी प्रयोगशील आहे. विषय, मांडणी आणि मार्केटबाबतीत ते प्रयोग करायला धसावत नाही. राजामौलीचा मगधीरा, मख्की, शंकरचा रोबोट, ए आर मुरुगदोसचा गजनी, तिकडचे दिग्दर्शक ही प्रेक्षकांना नवीन काही तरी देऊ लागले. यामुळं तिथला प्रेक्षक बॉक्स ऑफिसला बांधून राहिला. त्याला निसटण्याची संधीच त्यांनी दिली नाही.
याच्या बिलकूल विरुद्ध हिंदीत घडलं. शाहरुख आपल्या रोमँटिक चौकडीत अडकला, अक्षय, सलमान आणि अजय देवगणनं साऊथ सिनेमांच्या रिमेकमध्ये शरणागती पत्करली. आयुशमान खुराना, शाहिद कपूर, रणवीर कपूर आणि रणबीर सिंग यांच्यासोबत इम्तियाज अली, अख्तर बहीण-भाऊ आणि राजकुमार हिराणी यांनी नवीन बरंच काही करण्याचा प्रयत्न केलाय, पण ओटीटीनं त्यांचा घात केलाय, असं म्हणायला हरकत नाही. ओटीटीमुळं प्रेक्षकांना आपल्याला जे आवडेल ते पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं. फिल्म निर्मितीत साऊथचा स्पीड चांगला आहे. इंडस्ट्री एकवटलेली आहे. यामुळं कोरोना लॉकडाऊनच्या काळात ओटीटीवर साऊथनं एकापाठोपाठ चांगले सिनेमे दिले. त्याचा फायदा अनलॉकनंतर पुष्पाला झाला असं म्हणायला हरकत नाही. कधीही लॉकडाऊन लागू शकतो या भीतीत असताना दुसऱया लाटेनंतर ‘पुष्पा’ सिनेमा रिलीज करण्याचं धाडस निर्मात्यानं दाखवलं. आर्या (2004) पासून तयार झालेल्या अल्लू अर्जुनच्या तरुण फॅनफॉलोअर्सनं पुष्पावर उडय़ा मारल्या.
या सर्व घटनांकडे लाट म्हणून पाहायला हरकत नाही. ओटीटी आणि टीव्हीमुळं प्रेक्षक आणि त्याची आवड-निवड सतत बदलतेय. सोशल मीडिया आणि पियर प्रेशरमुळं सिनेमांची गर्दी आणि ह्यूव्ज वाढतायत. प्रेक्षक असाच बदलत राहील. आधी सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज व्हायचा आणि त्यानंतर त्याचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर व्हायचं. आता आधी थिएटर्स आणि नंतर लागलीच ओटोटीवर असं घडतंय. हिंदुस्थानात झालेलं 54 टक्के इंटरनेट पेनिट्रेशन अर्थात इंटरनेटचा प्रसार हेदेखील एक कारण आहे. हातात चोवीस तास आलेल्या सेकंड क्रीननं थिएटर्सला मागे टाकलंय. आता तर खिशाला परवडतील अशी सबक्रिप्शन्स स्किम्स सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन आलेत. याचा फायदा सिनेमाला झालाय. याचं करेक्शन कधी ना कधी होईलच. तोवर साऊथचा रावडी खूप पुढे गेलेला असेल यात शंका नाही.
(लेखक फ्रिप्रेस्की या आंतरराष्ट्रीय सिनेमा समीक्षक संघटनेचे सदस्य आहेत)
[email protected]





























































