
झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ मालिकेत अज्याची भूमिका साकारलेला अभिनेता नितीश चव्हाण हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नितीशचा अपघाती मृत्यू झाल्याची अफवा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पसरली होती. त्यानंतर नितीशने एक व्हिडीओ शेअर करत तो सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्या घटनेच्या काही दिवसातच आता नितीशने त्याच्या जीवाला धोका असल्याची पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
नितीश सध्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. ‘आमच्या जीवाला धोकाय’ असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. या पोस्ट मध्ये तो हातात एक फलक घेऊन उभा आहे. ‘आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. आमच्या जीवाला धोकाय’ असं या फलकावर लिहिलेलं आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
‘मी आतापर्यंत सोशल मीडियावर माझ्या रिलेशनबद्दल सांगितलं नाही. कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, मला खरंतर हे असं सगळ्यांसमोर सांगायचं नव्हतं. पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत, म्हणून हे सांगावं लागतंय,’ असं नितीशने लिहिलंय. या पोस्टमध्ये त्याने अभिनेत्री मानसी भावलकर हिला टॅग केलंय.
दरम्यान मानसीने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर असाच फोटो शेअर करत चाहत्यांना मदतीची विनंती केली आहे. तिने कॅप्शन मध्ये लिहिलं की,’आमच्या घरच्यांचा विरोध असल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलायला लागलं. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे ‘ असं तिने पोस्ट केला आहे. त्यामुळे हे चित्रपटाचं किंवा वेब सीरिजची जाहिरात करत असल्याचा अंदाजही नेटकरी लावताना दिसले.

























































