लेख – हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ातील एक सुवर्ण पान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

नेताजी हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये एक महत्त्वाचे घटक होते. प्रत्येक हिंदुस्थानीने नेताजींचे योगदान समजून घेणं आणि त्यांच्या प्रतिमेभोवती साम्यवादी, हुकूमशाह, परकीय शक्तींचे हस्तक यासारखं उभं केलं जाणारं मळभ दूर करणे, हीच त्यांच्या 125 व्या जयंती वर्षात वाहिलेली सर्वोत्कृष्ट आदरांजली असेल. आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस हे हिंदुस्थानी स्वातंत्र्य लढय़ातील एक सुवर्ण पान आहे.

स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींच्या नेतृत्वाखाली

काँग्रेसची चळवळ प्रभावी बनत होती. सुभाषचंद्र बोस त्याकडे आकर्षित झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एवढा की, लवकरच तरुण वर्गाचे ते चाहते बनले. त्रिपुरा येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली, पण कार्यकारिणीकडून क्रांतिकारी पावले उचलण्यासाठी अपेक्षित पाठबळ मिळणार नाही म्हणून त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्याचवेळी युरोपमध्ये दुसऱया महायुद्धाचे वातावरण तयार होऊ लागले. व्हर्सायच्या तहाने दोस्त राष्ट्रांनी जर्मनीचे नुकसान केले. दोस्त राष्ट्रांचा सूड घेणे असा कार्यक्रम जर्मन जनतेसमोर ठेवून हिटलर जर्मनीत सत्तेवर आला. त्याने युद्धाची तयारी सुरू केली. आशियात जपान हा साम्राज्यवादी देश म्हणून उदय पावत होता. अशा रीतीने जर्मनी, इटली व जपान असा एक गट तयार झाला. त्याला विरोधी इंग्लंड, फ्रान्स, रशिया या दोस्त राष्ट्रांचा गट अशी दोन गटांत विभागणी झाली. सुभाषचंद्रांनी या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला. आपल्या शत्रूचा म्हणजे इंग्रजांचा शत्रू तो आपला मित्र. इंग्रजांच्या शत्रूची मदत घेऊन जर हिंदुस्थानवर बाहेरून हल्ला केला तर हिंदुस्थान स्वतंत्र होईल. म्हणून ते प्रथम युरोपात गेले, पण त्यांना हिटलरकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. नंतर जपानचे सहकार्य घ्यावे म्हणून जपानला गेले.

बंगालमधले क्रांतिकारक रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना जपानच्या सहकार्याने उभारली होती. सुभाषचंद्र जपानमध्ये आल्यावर रासबिहारींनी ती सेना त्यांच्या ताब्यात दिली. सुभाषचंद्र आझाद हिंद सेनेचे प्रमुख बनले. तेव्हापासून त्यांना ‘नेताजी’ म्हटले जाऊ लागले. मेजर जगन्नाथराव भोसले, मेजर धिल्लन, कॅप्टन शहानवाज ,कॅप्टन लक्ष्मी सहगल असे सहकारी नेताजींना मिळाले. त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. टोकियो नभोवाणीवरून हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या लढय़ाची घोषणा केली. दि. 21 ऑक्टोबर, 1943 या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, विदेशमंत्री, युद्धमंत्री आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून शपथ घेतली. तरुणांना त्यांनी साद घातली- त्यांच्या आवाहनाला मोठाच प्रतिसाद मिळाला. ‘आझाद हिंद सेने’ने आराकानचे घनदाट जंगल, चिंद्विन-इरावतीसारख्या महाकाय नद्या, माऊंट पोपाचे उंच पर्वत पार करून ईशान्य हिंदुस्थानवर धडक मारली. इंफाळ आणि कोहिमामधील ब्रिटिश लष्करी अधिकाऱयांनी आपली होत असलेली पीछेहाट, अन्नधान्याची टंचाई पाहून शरणागतीची तयारी केली. ब्रिटनच्या ‘नॅशनल आर्मी म्युझियम’ने इंग्लंडने लढलेल्या आणि जिंकलेल्या दहा सर्वोत्कृष्ट लढायांची यादी जाहीर केली. याच दहा लढायांमध्ये इंफाळ-कोहिमाच्या युद्धाचा अग्रक्रमाने उल्लेख करण्यात आला आहे. आम्हाला ही लढाई जिंकण्यासाठी पराक्रमाची शर्थ करावी लागली, हे ब्रिटिशांनी मान्य केलं. इंफाळच्या लढाईला दुसऱया महायुद्धाच्या परिभाषेत ’डंकर्क ऑफ द ईस्ट’ असंही म्हणतात; ज्यात ब्रिटिशांचं दोन डिव्हिजन सैन्य जपान्यांच्या तावडीत जाता वाचलं.

‘आझाद हिंद सेने’ने शरणागती पत्करली. ‘आझाद हिंद सेने’वरचा राजद्रोहाचा खटला लाल किल्ल्यावर सुरू झाला, पण या क्षणापासूनच आझाद हिंद सैन्याचं खरं युद्ध ब्रिटिशविरोधात सुरू झाले. हे युद्ध ब्रिटिश सैन्यातल्या 25 लाख हिंदुस्थानी सैनिकांच्या मनाशी केलेलं युद्ध होते. लाल किल्ल्यावर खटला सुरू झाल्याबरोबर हिंदुस्थानींना अज्ञात असणारा आझाद हिंद सैनिकांचा पराक्रम हळूहळू माहीत होऊ लागला. जनतेतील आझाद हिंद सैनिकांची लोकप्रियता वाढू लागली. म्हणून ब्रिटिश सरकारला सर्व आझाद हिंद सैनिकांना मुक्त करावं लागलं. आझाद हिंद सैनिक आपापल्या गावी परतू लागले. त्यांचे गावोगावी जंगी स्वागत-सत्कार होऊ लागले. त्यांचे होणारे हे सत्कार पाहून, देशभक्त म्हणून झालेला गौरव पाहून अद्याप ब्रिटिश लष्करात असणाऱया हिंदुस्थानी सैनिकांना प्रश्न पडला, ’ब्रिटिशांशी बंडखोरी करून त्यांच्याच साम्राज्याशी युद्ध करणारे हे आझाद हिंद सैनिक जर देशभक्त असतील तर आपण कोण? देशद्रोही का?’ या सैनिकांच्या मनात चाललेली चलबिचल ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आली. त्यांनी तडकाफडकी त्यांचे निशस्त्र्ााrकरण करण्यास सुरुवात केली. ब्रिटिश लष्करातील हिंदुस्थानींची संख्या 25 लाखांवरून तीन लाखांवर आणली गेली. नाविक दलातील जहाजांवर 1946 च्या सुरुवातीला बंडाचे निशाण उभे राहिले.

अनेक ठिकाणी लष्कराच्या बराकीत ’जय हिंद’चे घोष निनादू लागले. रस्त्यावरून संचलन करत जाणाऱया ब्रिटिश लष्करावर सामान्य जनतेतून हल्ले होऊ लागले. या बंडाची धास्ती घेऊन गोऱया सैनिकांच्या आधाराने हिंदुस्थानातून पळून जाण्याची योजनाही ब्रिटिशांनी तयार केली होती, अशी माहिती ‘मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टरेट’ हिंदुस्थानी अधिकारी लेफ्टनंट जनरल सिन्हा यांना सापडलेल्या गोपनीय पत्रांतून मिळते, मात्र हिंदुस्थानात काही नेत्यांनी मध्यस्थी करून ’आपल्याला हिंसेने मिळालेले स्वातंत्र्य नको’ असा पवित्रा घेऊन आंदोलनकर्त्यांना आपले आंदोलन थांबवायला लावले.

ब्रिटिशांच्या 35 लाख सैन्यासमोर 50-60 हजारांच्या आझाद हिंद सैन्याचा निभाव लागणार नाही, हे नेताजींना माहीत होते, पण जेंव्हा ब्रिटिश सैन्यातल्या हिंदुस्थानींसमोर या 50 हजारांचा त्याग समोर येत नाही, तोपर्यंत ब्रिटिश सैन्यातल्या हिंदुस्थानींना बंदुका कुणाकडे वळवायच्या हे लक्षात येणार नाही, हे जाणून नेताजींनी ’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असं आवाहन जपानचे युद्धबंदी असणाऱया हिंदी सैनिकांना केलं. आझाद हिंद सेनेत सामील झाल्यामुळे ब्रिटिशांकडचा पगार बंद होणार, ‘आझाद हिंद सेने’त पगार मिळण्याचा प्रश्नच नव्हता आणि पुन्हा रणांगणावर उतरावे लागल्यामुळे जीव जाण्याची भीती असं असतानाही 50 हजार सैनिक नेताजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत उभे राहिले आणि मृत्यूला सामोरे गेले.