
मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची लेखी परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण न झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन दहावी-बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक आदी परीक्षा यांची तयारी, नियोजन आदींचा आढावा घेतला. तसेच लसीकरणाचीदेखील माहिती घेतली.
शालेय शिक्षण विभागाने दहावी-बारावी परीक्षांबाबत नव्याने नियोजन करण्याच्या सूचना बोर्डाला दिल्या आहेत. मागील वर्षभरात ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. लिखाणाच्या सवयीअभावी विद्यार्थी परीक्षेत कमी पडू नये यासाठी या परीक्षांमध्ये अर्ध्या तासाचा वाढीव वेळ देण्यात आला आहे. सध्या परिवहन महामंडळाच्या संपामुळे ग्रामीण भागातील एसटी बसेस नियमित सुरू नाहीत. बरेच विद्यार्थी गावात शाळा नसल्यामुळे शिक्षणासाठी इतर गावात जातात. असे विद्यार्थी वाहतुकीच्या सोयीअभावी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ‘शाळा तेथे केंद्र’ देण्यात यावे. अथवा अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करता येईल का, या बाबींचाही विचार करण्यात यावा, असे निर्देश यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिले. तसेच ऑनलाइन अभ्यासक्रम किती टक्के पूर्ण करण्यात आला आहे, याबाबतचा अहवाल त्वरित सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
लसीकरणाचा नियोजनपूर्वक कार्यक्रम राबवा
15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यामध्ये या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या लसीकरणाला वेग येण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करावे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी मायक्रोप्लॅनिंग करण्यात यावे. या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलता आल्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळेल. यासाठी शिक्षण विभाग, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात समन्वयाने पुढील कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी दिले.


























































