बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांची लॉटरी; अभ्यासक्रमातील 40 टक्के प्रयोगांवर आधारित प्रात्यक्षिक परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुणांची लॉटरी लागणार आहे. सायन्स शाखेतील विषयनिहाय प्रयोगांची संख्या कमी करण्यात आली असून अभ्यासक्रमातील केवळ 40 टक्के प्रयोगांवर आधारितच प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर अंतर्गत व बाह्य परीक्षकांचे काम त्या–त्या विषय शिक्षकानेच करावे, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जारी करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीदेखील अभ्यासक्रम 25 टक्के कमी केला आहे. त्यातच बारावीचे वर्गही उशिराने सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत प्रात्यक्षिके पूर्ण करता आलेली नाहीत. ही बाब विचारात घेऊन शिक्षण मंडळाने विषयनिहाय प्रात्यक्षिकांची संख्या किमान 40 टक्के केली आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षाही विद्यार्थ्यांना विषय शिक्षकांसमोरच द्यावी लागणार आहे. तसेच सायन्ससह आर्टस्, कॉमर्स आणि व्यावसायिक शाखांतील विविध विषयांची श्रेणी, तोंडी आणि इतर अंतर्गत मूल्यमापनाची जबाबदारी शाळा आणि ज्युनियर कॉलेजवरच असणार आहे.

  • अभ्यासक्रमातील 40 टक्के प्रात्यक्षिकांची निवड शाळा, ज्युनियर कॉलेज करतील. त्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.
  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या (पीसीबी) गटासाठी प्रत्येकी 30 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असेल.
  • गणित व संख्याशास्त्र विषयासाठी 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा.

लेखी परीक्षेआधी व नंतरही तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा देता येणार

बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे. सदर काळात विद्यार्थी कोरोना झाल्यामुळे परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे. तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आऊट ऑफ टर्न परीक्षा यंदा होणार नसून त्यांनाही याचदरम्यान परीक्षा द्यावी लागणार आहे.