
सोलापूर शहरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांसोबत आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतच शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय होणार असून, पालकवर्गातून मात्र शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सोलापूर शहरात जानेवारीत कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात सध्या 2200हून अधिक रुग्ण ऑक्टिव्ह आहेत. राज्य शासनाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे 10 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला असून, या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीनंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे आवश्यक असून, शहरातील साडेचार हजार शिक्षक कर्मचाऱयांपैकी 50 टक्क्यांहून कमी जणांची माहिती प्रशासनाकडे आली आहे. त्यामुळे शाळा सुरू होणार की तारीख वाढणार, याबाबत संभ्रम आहे. सोमवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपत्तिव्यवस्थापनाच्या बैठकीनंतर नगर जिल्ह्याचा निर्णय होणार
नगर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात पुढील आठवडय़ात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत आपत्तिव्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेताना स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत. नगर जिह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याकारणाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱयांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडाभर लांबणीवर टाकला होता. त्यानुसार आता पुढील आठवडय़ात आपत्तिव्यवस्थापन समितीची पुन्हा बैठक होणार असून, त्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्यास त्यानुसार शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवारी अथवा बुधवारी समितीची बैठक होऊन त्यात शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱयांनी सांगितले.





























































