
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कल्याणी गावात शनिवारी मोठ्या थाटात पार पडणारा बालविवाह पारध पोलिसांनी रोखून अल्पवयीन वधूला जालना येथे महिला बालकल्याण समितीच्या स्वाधीन केले आहे.
भोकरदन तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या असलेल्या कल्याणी गावात मागील काही महिन्यांपूर्वी एक लग्नसंबंध गठित करण्यात आला होता. तो शनिवारी पार पडणार होता. पंरतु मुलगी ही अल्पवयीन असून केवळ 13 वर्षांची असल्याची माहिती पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांना मिळाली होती.
त्यानुसार पारध पोलिसांनी थेट शनिवारी लग्न मंडपात जाऊन कारवाई करीत दोघांची चौकशी केली असता वधू 13 वर्षांची तर वर हा 24 वर्षांचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर ठिकाणील विवाह रोखून त्यांना जालना येथील महिला व बालकल्याण समितीच्या स्वाधीन केले.
यावेळी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आर.वाय.वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, पोलीस नाईक भरत चौधरी, पोलीस नाईक दिनेश पायघन, पोलीस अमलदार शिवाजी जाधव, महिला पोलीस अमलदार वर्षा रिट्टे आदींनी काम पाहिले. शिवाय परिसरात कुठेही असे प्रकरण निदर्शनास आल्यास पारध पोलीस स्टेशनला कळवावे. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन सपोनी मोरे यांनी केले.



























































