नाशिकच्या अंबड येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chhagan-bhujbal-subhash-des

अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत नाशिक येथे होणारा सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंदर्भातील मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तात्काळ या कामाला सुरुवात करावी असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेवून गोदावरीचे प्रदूषण होऊ नये या प्रकल्पाचे काम गतीने व्हावे अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत केली.

मंत्रालयातील दालनात मंत्री सुभाष देसाई आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत येथे सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई बोलत होते.यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सहसचिव अजित पाटील, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, सहसचिव संजय देंगावकर, वैज्ञानिक अधिकारी डॉ.अमर सुपाते, मुख्याधिकारी एस.आर.तुपे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत नाशिक येथे होणारा सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत वैज्ञानिक अधिकारी डॉ.सुपाते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने या प्रकल्पाबाबत अनुकूल अहवाल दिला आहे. या अहवालातील सुचना लक्षात घेऊन औद्योगिक विकास महामंडळाने त्याप्रमाणे कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे या कामात दिंरगाई न करता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या कामाला प्राधान्य द्यावे अशा सूचना यावेळी मंत्री देसाई यांनी बैठकीत केल्या.

प्रकल्प पूर्ण करताना डॉ. सुपाते यांच्या समितीने दिलेल्या सूचनांचेही पालन केले जावे – छगन भुजबळ

भुजबळ म्हणाले, अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत नाशिक येथे होणारा सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम होताना नदीतील पाण्याचे प्रदुषण होता कामा नये. तसेच नदीच्या पाण्याच्या शुद्धता रहावी यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. कारण हा प्रश्न लोंकाच्या आरोग्याशी संबधित आहे.हा प्रकल्प राबविणाऱ्या यंत्रणांनी कामाला प्राधान्य द्यावे दिलेल्या वेळेत हा प्रकल्प पूर्ण करताना वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुपाते यांच्या समितीने दिलेल्या सूचनांचेही पालन केले जावे असे मत यावेळी भुजबळ यांनी मांडले.