
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमायक्रोन व्हेरिएंटने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे; पण आता बीए. 2 हा ओमायक्रोनच्या व्हेरिएंटचा नवा अवतार आला आहे. हिंदुस्थानसह जगातील 57 देशांमध्ये बीए.2चा संसर्ग ओमायक्रोनपेक्षा अधिक वेगाने होत असल्याचे पुढे आल्यामुळे संपूर्ण विश्वाची चिंता वाढणार आहे.
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार ओमायक्रोनचा बीए.2 या सब व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग ओमायक्रोनपेक्षा अधिक आहे. या व्हेरिएंटचा प्रसार अतिशय वेगाने होतो. मात्र या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग किती घातक आहे याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. बीए.2च्या संसर्गाच्या घातकतेची तीव्रता शोधण्याचा वैज्ञानिकांचा सध्या प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर या नव्या व्हेरिएंटचा मुकाबला कसा करायचा याचीही तयारी सुरू झाली आहे.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रोनचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण बीए.2चा संसर्ग त्यापेक्षा अधिक वेगाने होत असण्याची शक्यता आहे. डेन्मार्कमध्ये बीए.2चा संसर्ग अधिक वेगाने झाल्याचे वृत्त आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात 8 हजार 500 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी घरातच बसणारे 39 टक्के लोक बीए.2 व्हेरिएंटच्या विळख्यात सापडले होते.




























































