मेघालयात काँग्रेसला झटका; पाचही आमदारांची सोडचिठ्ठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु असतानाच मंगळवारी काँग्रेसला मेघालयमध्ये जोरदार झटका बसला. काँग्रेसच्या उरलेल्या सर्व पाचही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि मेघालय लोकशाही आघाडीत (एमडीए) प्रवेश केला. याआधी नोव्हेंबरमध्ये 12 आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसचे हेच पाच आमदार शिल्लक होते.

नोव्हेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 आमदारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ उरलेल्या पाच आमदारांनीही मंगळवारी पक्ष सोडल्याने काँग्रेसचे भक्कम विरोधी पक्ष बनण्याचे स्वप्न भंगले आहे. एम. अंपरीन लिंगडोह, पीटी साकमी, माइरलबोर्न साइम, किंफा एस मरबानियांग व मोहेंद्रो रापसांग या आमदारांनी काँग्रेसला रामराम केला आहे.