
अनेक लग्नांमध्ये नवरा घोड्यावर बसून नवऱ्या मुलीच्या घरी वरात घेऊन जातो, अशी पद्धत आहे. देशात अनेक ठिकाणी ही पद्धत आजही पाळली जाते. वऱ्हाडी या निमित्ताने आपली वरातीत नाचण्याची हौस भागवून घेतात. पण, सध्या एका अनोख्या लग्नाची चर्चा आहे.
गुरूग्राम इथे झालेलं हे लग्न समानतेच्या अनोख्या पद्धतीमुळे चर्चेत आलं आहे. कारण, इथे वरात घेऊन नवरा मुलगा नाही तर मुलगी मुलाच्या दारात आली. या नवऱ्या मुलीचं नाव प्रिया असून ती हरयाणाच्या अंबालाची रहिवासी आहे. मंगळवारी ती घोड्यावर बसून गुरुग्राम येथील आपल्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचली. तिच्या हातात नवऱ्या मुलाकडे असणारी तलवारही देण्यात आली होती.
मी माझ्या घुडचढी (घोड्यावर बसण्याची परंपरा)मुळे प्रचंड खुश आहे. हा दिवस एका मुलीच्या आयुष्यात कधीच येत नाही. कारण, नेहमी नवरा मुलगा घोड्यावर बसून वरात मुलीकडे घेऊन जातो. ही पद्धत मुलांपुरती मर्यादित असून मुलांनाच अनेक कुटुंबांमध्ये प्राधान्य दिलं जातं. पण, माझे पालक मला आणि माझ्या भावाला समान वागणूक देतात, असं प्रिया म्हणाली आहे.
प्रियाच्या वडिलाचं नाव नरेंद्र अगरवाल असं असून ते म्हणतात की मुलगा आणि मुलगी यांच्या भेदभाव केला जाऊ नये. आमचा अशा प्रकारे मुलीला वरातीत घोड्यावर बसून आणण्यामागे महिलांविरोधातील अन्यायाला विरोध करणं हा हेतू आहे. मुलींनाही समान वागणूक, दर्जा आणि आदर मिळायला हवा जो मुलांना मिळतो, असं त्यांचं म्हणणं आहे.




























































