
त्याचे मूळ नाव भरत होते, एकाचा खून केल्यावर त्याने अभिमान असे नवे नाव धारण केले, पण पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचलेच. 11 वर्षांपूर्वीच्या खुनाचा गुन्हा नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघड केला आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हाती घेतलेल्या प्रलंबित गुन्हे निपटारा मोहिमेत चोरी व अपहरण प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेताना, त्याने अपहरण केलेल्याच्या केलेल्या खुनाचा गुन्हाही पोलिसांनी उघड केला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक पाटील यांनी एल सी बी चे पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
याबाबतची माहिती अशी की, तब्बल 11 वर्षांपूर्वी पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरी व अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करुन गुन्ह्याची उकल करण्यात व अपहृत व्यक्तीचा खून करणार्या आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची उकल केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. भरत मारुती सानप (रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. 11 पूर्वी त्याने अनिल सखाराम सोनवणे (वय 29) याचा खून करुन त्याचा मृतदेह सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळून पुरावा नष्ट केला होता. त्यानंतर आजपर्यंत आरोपी नावात बदल करुन व ओळख लपवून राहात होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके हे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधील गंभीर स्वरुपाच्या उघड न झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेत असताना पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अपहरण व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भरत मारुती सानप हा अद्याप फरार असल्याचे निदर्शास आले होते. सन 2011 मध्ये 23 मार्च रोजी नितीन सखाराम सोनवणे (वय 24, रा. यमुनानगर, विमाननगर, पुणे) यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. 11 मार्च 2011 रोजी फिर्यादीचा भाऊ अनिल सखाराम सोनवणे हा व त्याचा ड्रायव्हर भरत मारुती सानप हे ट्रक (एमएच-12-एव्ही-6449) घेवून रायपुर येथे वायर भरण्यासाठी गेले होते. 16 मार्च 2011 रोजी रायपुर येथुन 5 लाख 48 हजार 940 रुपयांची वायर भरुन पुणे येथे येण्याकरीता निघाले होते. 18 मार्च 2011 रोजी सकाळी ते जालना येथे आल्याबाबत अनिल सोनवणे याने फोन करुन भावाला कळविले होते. त्यानंतर त्याचा फोन लागला नाही. 21 मार्च 2011 रोजी सदर माल ट्रक बेवारस अवस्थेमध्ये भगवानगड (ता. पाथर्डी) येथे आढळून आली होती.
ट्रकमधील वायर नव्हती. तसेच ट्रकच्या कॅबीनमध्ये रक्ताचे डाग होते. तसेच अनिल सोनवणे याच्या सोबतचा भरत सानप याचा फोन बंद होता. त्यामुळे भरत सानप याने अनिल सोनवणे यास जबर मारहाण व घातपात करण्यासाठी अपहरण करुन ट्रक मधील वायर बळजबरीने चोरुन नेली असल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना या आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि गणेश इंगळे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाने, पोना भिमराज खर्से, सुरेश माळी, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार व चापोहेकॉ बबन बेरड यांचे स्वंतत्र पथक स्थापन करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करुन आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. पथकाने गुन्हा व गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती घेतली असता आरोपी भरत मारुती सानप हा सध्या कन्हेरवाडी (ता. परळी, जिल्हा बीड) येथे नावात बदल करुन व ओळख लपवून राहत असल्याची माहिती तपास पथकास मिळाली. त्यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.
त्याने अभिमान मारुती सानप (वय 37, रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे चुकीचे नाव सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. अभिमान मारुती सानप नाव असल्याचे आधारकार्डही त्याने पथकाकडे सादर केले. पथकाने त्यास विश्वासात घेवून कसुन चौकशी करत त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये त्याच्याकडे सन 2006 मधील मतदान ओळखपत्र सापडले. त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असे निष्पन्न झाले. त्याने मीच भरत मारुती सानप असे असल्याचे सांगत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा केल्याने पोलिसांनी पकडू नये म्हणून मी माझी ओळख लपवुन नावात बदल करुन राहत होतो, अशी कबुली दिली.
अनिल सोनवणे हा नेहमी मला माझ्या पत्नी विषयी वाईट बोलायचा त्याचा मला राग होता. म्हणुन देवरीगाव (जिल्हा गोंदिया) येथे ट्रकच्या टायर मधील हवा चेक करण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यावेळी आमच्यामध्ये वाद झाले. मला त्याचा राग आल्याने मी त्याच्या डोक्यात व्हील पाना मारला होता. त्यावेळी तो जागेवर बेशुध्द झाल्याने मी त्याला तसच उचलुन गाडीच्या केबिनमध्ये टाकले होते. मी ट्रक चालवत सिंधखेडराजा येथे आल्यावर अनिल सोनवणे याची हालचाल बंद झाल्याने तो मयत झाला, असे समजुन मी त्यास सिंधखेडराजा ते जालना रोडवरील खदानजवळ नाल्यावरील पुलाजवळ त्याला पेटवुन दिले. त्यानंतर सुनिल आश्रुबा सानप व परमेश्वर उत्तम दराडे यांच्या मदतीने वायरची विल्हेवाट लावली होती, असे त्याने कबूल केले.
आरोपीने दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस पथक सिंदखेडराजा पोलीस स्टेशन येथे गेले. यावेळी 19 मार्च 2011 रोजी सिंधखेडराजा पोलीस स्टेशन येथे कलम 302, 201 प्रमाणे खूनन करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी न मिळाल्याने गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आलेला होता. आरोपी निष्पन्न झाल्याने तपास पथकाने आरोपीला ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
अनेक वर्षे जुना असलेल्या या गंभीर गुन्ह्याचा तपास करुन खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आरोपी हा ओळख बदलून राहत असताना त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. ज्या व्यक्तींच्या मदतीने वायरीची विल्हेवाट लावण्यात आली होती, त्या दोघांना त्याच वेळी अटक झाली होती, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.























































