दशावताराचा लोकराजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सतीश पाटणकर

आजही दशावतार नाट्य रसिक गजाली करताना म्हणतो, ‘कोणी कितकेय येवो… राजपार्ट करूचो नि राजा बघूचो तर सुधीर कलिंगणाचो! अगदी खरोखुरो राजा.. काय ता राजासारा दिसणा… बसणा नि बोलणा…असो राजा पूर्वी होवक नाय नि पुढे केवा होयत म्हायत नाय!!’ शिवराम ऊर्फ सुधीर महादेव कलिंगण.

‘दशावतार’ ही कला म्हणजे कोकणच्या मातीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा कोकणच्या मातीत कोकणी माणसानं आजमितीपर्यंत आवर्जून जपलेला आहे. दशावतार हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तो कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा आहे. ही ओळख अधिक घट्ट करण्यात आणि घराघरांत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे लोककलावंत म्हणजे शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण.

कोकणच्या दशावतारातील ‘लोकराजा’ म्हणून नावलौकिक मिळविलेले शिवराम ऊर्फ सुधीर महादेव कलिंगण हे कुडाळ तालुक्यातील नेरूर शिरसोसवाडी येथील रहिवासी. कोकणची लोककला टिकवणारे दशावतारातील भीष्माचार्य म्हणून नावारूपास आलेले पै. बाबी कलिंगण यांचे सुपुत्र. ते ज्येष्ठ दशावतारी कलावंत, श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूरचे मालक, सांस्कृतिक संचालनालय मुंबई लोककला शिफारस समितीचे सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा दशावतारी चालक-मालक संघाचे सहसचिव होते. दशावतार क्षेत्रातील प्रसिद्ध लोककलाकार महादेव ऊर्फ बाबी कलिंगण यांचा वारसा त्यांचे सुपुत्र सुधीर कलिंगण यांनी पुढे सुरू ठेवला होता. दशावतार लोककला सातासमुद्रापार नेण्यात त्यांचा वाटा होता. दशावतारातील लोकराजा तसेच नटसम्राट म्हणून ते परिचित होते. प्रमुख राजाच्या भूमिकेसह महारथी कर्ण, राजा हरिश्चंद्र, वेडा चंदन, वृंदा जालंधर आदींसह विविध भूमिका त्यांनी साकारत रसिकांची मने जिंकली. श्रीकृष्णाचीही लक्षवेधी भूमिका साकारली होती. ट्रिकसीनयुक्त नाटय़प्रयोग सादर करीत रसिकांच्या मनात वेगळी छाप पाडली. गेली वीस वर्षे ते श्री कलेश्वर दशावतार नाटय़ मंडळ चालवीत आहेत. एस. टी. महामंडळातही चालक म्हणून नोकरी करणाऱ्या सुधीर कलिंगण यांचा पिंडच कलाकाराचा होता. दशावताराबद्दल विलक्षण आकर्षण या भावनेपोटीच त्यांनी स्वतःला या कलेकरिता वाहून घेतले.

गुरुकुल योजना प्रस्तावितच राहिली
सिंधुदुर्ग जिह्यातील दशावतारी कलाकारांना एकत्र येऊन दशावतारी कला महासंघ स्थापन करावा यासाठी गेली तीन वर्षे वेंगुर्ल्यातील उद्योजक आणि कलाप्रेमी एम. के. गावडे आणि मी स्वतः प्रयत्नशील होतो. पण त्याला हवी तशी गती मिळत नव्हती. तीन महिन्यांपूर्वी वेंगुर्ला येथे सर्व दशावतारातील कलाकार यांची बैठक पार पडली व त्यात सुधीर कलिंगण यांना अध्यक्ष करून महासंघ नोंदणी करण्याचे ठरविण्यात आले, पण कदाचित नियतीच्या मनात तसे नसावे. ‘दशावतार’ ही कोकणचे वैभव म्हणून ओळखली जाणारी लोककला आहे. येथील नवोदित कलाकारांना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्यासाठी गुरुकुल राबविण्याचा मानस यावेळी सुधीर कलिंगण यांनी जाहीर केला होता.

सुरुवातीस वनराज नाटकात बाल वनराजच्या भूमिकेतून ते प्रथमच रंगमंचावर आले. त्यात चिलिया बाळ, रोहिदास आदी भूमिकाही केल्या आहेत. त्यानंतर वडिलांनी 1986 साली स्वतंत्र कलेश्वर दशावतार नाट्य कंपनी काढली. त्यापूर्वीही 1984-85 मध्ये खानोलकर दशावतार पंपनी चालवण्यास घेतली होती. त्यात वडिलांसह ते दोघे भाऊ, बाळ व मी कामे करायचो. कधी कधी स्त्री पात्राची भूमिकाही निभावली. हे सगळं करत असताना दिवसभर एसटी विभागात चालकाची भूमिकाही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. दशावतार नाटकात काम करताना संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. म्हणूनच 2010 साली ठाणे महापौर पुरस्कार तर चौथ्या मालवणी संमेलनात कृष्णाच्या भूमिकेसाठी सर्व मराठी सिनेकलाकारांनी कौतुकाची थाप मारली. राजाची भूमिका करताना त्याची भाषा राजासारखी असावी, असे सुधीर कलिंगण म्हणत. कोकणच्या दशावताराला मोठय़ा प्रमाणात लोकाश्रय असून दशावतार कलाकार मात्र राजाश्रयाच्या प्रतीक्षेत असल्याचे ते म्हणायचे. आपले वडील बाबी कलिंगण यांनी 16 वर्षे पार्सेकर दशावतार नाटय़ मंडळात योगदान दिले असून पार्सेकर घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. याच कंपनीतून आपण वयाच्या नवव्या वर्षापासून बालकलाकार म्हणून उदयास आलो. स्वतः प्रभाकर पार्सेकरांनी माझी रंगभूषा केली असल्याचे सुधीर कलिंगण अभिमानाने सांगायचे. या सर्व कलेत त्यांना गुरू सावळाराम नेरकर, बाबी नालंग, गोविंद तावडे, विश्राम कदम, श्रीधर मुळीक व यशवंत तेंडोलकर यांची साथ लाभली. गेल्या अठरा वर्षांच्या चालकपदाच्या सेवेत 15 वर्षे विनाअपघात सेवा बजावल्याबद्दल एसटी प्रशासनाकडून त्यांना गौरवण्यात आले होते. दशावतारासह ‘अनवट’ आणि ‘घो मला असला हवा’ या दोन चित्रपटांत काम केले. नाट्यात समर्पक संगीताचा वापर करणे, आधुनिक रंगभूषा आणि वेशभूषेचा वापर करण्याचे काम त्यांनी केले. दशावतारी कलावंतांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, संयुक्त दशावताराची संकल्पना राबविणे, कलाकाराचे राहणीमान उंचाविणे यासाठी सुधीर कलिंगण नेहमीच प्रयत्नशील होते.

आजही दशावतार नाट्यरसिक गजाली करताना म्हणतो, ‘कोणी कितकेय येवो… राजपार्ट करूचो नि राजा बघूचो तर सुधीर कलिंगणाचो! अगदी खरोखुरो राजा.. काय ता राजासारा दिसणा… बसणा नि बोलणा…असो राजा पूर्वी होवक नाय नि पुढे केवा होयत म्हायत नाय!!’ 7 फेब्रुवारी 2022 रोजी या महान दशावतारी राजाने आपली इहलोकीची यात्रा संपविली. कोकणातील लोकसंस्कृती टिकवून ठेवणाऱ्या दशावतारी नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारणारे नट, शिवराम ऊर्फ सुधीर महादेव कलिंगण यांच्या निधनाने दशावतारी नाट्यक्षेत्राचा आधारस्तंभ हरपला आहे. वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी सुधीर यांचे जाणे धक्कादायक आहे.