
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाला जोडणाऱया गोदावरी नदीवरील नागमठाण-चांदेगाव येथील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. या पुलाचे काम सुरू करण्यासाठी श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यांतील पंचक्रोशीतील नागरिकांनी अर्धवट पुलावर चढून सामूहिक ‘जलसमाधी’ आंदोलन सुरू केले. त्यामुळे वैजापूर, संभाजीनगर, तसेच श्रीरामपूर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली.
नगर जिल्ह्यातून मराठवाडय़ात जाण्यासाठी प्रवरा संगम पूल आहे. या वाहतुकीला पर्याय म्हणून श्रीरामपूर-वैजापूर हद्दीवर गोदावरी नदीवर पुलास मंजुरी देण्यात आली. श्रीरामपूर तालुक्यातील खोकरफाटय़ापासून मुठेवाडगाव, माळवाडगाव, खानापूरपर्यंतचे रस्ते आमदार निधीतून होत आहेत; परंतु नागमठान-चांदेगाव यादरम्यानच्या पुलाचे काम बंद असल्याने गोदावरी नदीकाठावरील वैजापूर हद्दीत नागमठान, तसेच श्रीरामपूर हद्दीत महांकळवाडगाव हे पुलाला जोडणारे रस्तेही रखडले आहेत. नागमठान पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वैजापूर प्रशासकीय विभागाला पुलावर चढून सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.
वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, उपनिरीक्षक कदम, तहसीलदार राहुल गायकवाड, नायब तहसीलदार कुलकर्णी, सर्कल अधिकारी नरोडे, कामगार तलाठी गायकवाड, वैजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. बी. काकड हे घटनास्थळी दाखल झाले. आमदार रमेश बोरनारे, जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य समिती सभापती अविनाश गलांडे, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, माजी सभापती बाबासाहेब जगताप, भीम तांबे, गणेश विखे, आर. बी. तांबे, गणेश चव्हाण, दिनेश परदेशी, सतीश शिंदे, मुक्ता डांगे, सुभाष भराडे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळी उशिरा कार्यकारी अभियंता (पश्चिम विभाग) यांनी लेखी पत्र दिले असून, पाणी कमी झाल्यानंतर 17 फेब्रुवारीपासून ठेकेदार काम सुरू करणार असून, जून 2022पर्यंत निधी उपलब्धतेप्रमाणे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतर बाबासाहेब डांगे, गणेश तांबे, सुभाष खुरूद, मोहन दिवटे, पवन चव्हाण, प्रवीण चव्हाण, महिंद्रा बोधक, घनश्याम चव्हाण, रामनाथ पवार, कृष्णा गवळी, शरद वाढे, राजेंद्र खुरूद, गणेश ठोंबरे आदींनी आंदोलन मागे घेतले.



























































