मुंबईचे तापमान 2.5 डिग्रीने वाढणार, वाढत्या शहरीकरणामुळे ‘पारा’ झेपावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि आसपासच्या परिसरात लोकसंख्यावाढीबरोबर शहरीकरणही वाढत आहे. त्याचा परिणाम तापमान वाढीमध्ये होत आहे. मुंबईचे सरासरी तापमान 28 ते 32 डिग्री सेल्सियस असते. सन 2050 पर्यंत त्यात 2.4 डिग्री सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी अभ्यासाअंती व्यक्त केला आहे. मुंबईजवळील अंबरनाथ येथे शहरीकरणाचा वेग पाहता तेथील सरासरी तापमानात याच कालावधीपर्यंत 5.3 डिग्री सेल्सियसने वाढ होईल. शहरांतील या तापमानवाढीमुळे घराबाहेर काम करणाऱया नागरिकांना दिवसाचे 3 ते 5 तास अधिक उकाडा सहन करावा लागणार आहे असे संशोधकांचे अनुमान आहे. आयआयटी मुंबईतील प्राध्यापक शिरीषकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक भणगे यांनी हा अभ्यास केला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) लोकसंख्या 2050 पर्यंत 3 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. संशोधकांनी एमएमआर क्षेत्रातील जमिनीच्या वापरात झालेल्या बदलाचा अभ्यास केल्यानंतर तापमानवाढीचा अनुमान लावला. यापूर्वीच विकसित झालेल्या मुंबई आणि ठाण्यातील सरासरी तापमानात अनुक्रमे 0.2 आणि 0.3 इतकी वाढ होताना दिसते. अंबरनाथमध्ये त्यापेक्षाही अनेक पटीने तापमानात वाढ होऊ लागली आहे असे हा अभ्यास अहवाल सांगतो.

इमारती पांढऱया रंगात रंगवा
शहरांमधील इमारतींच्या भिंती आणि छतांवर रंगरंगोटीसाठी पांढऱया रंगाचा वापर केला तर दैनंदिन तापमान सुमारे 1 डिग्रीने कमी करता येऊ शकते असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकास योजनेमध्येच तसे धोरण अवलंबले जाऊ शकते असेही त्यांचे मत आहे.

परिणामांचा विचार करा
आशिया खंडातील महत्वाच्या शहरांमध्ये विकासासाठी मास्टर प्लॅन राबवला जातो. परंतु विकासामुळे पर्यावरणावर होणाऱया परिणामांचा अंदाज घेतला जात नाही, असे मत या अभ्यासात सहभागी झालेले जपानच्या हिरोशिमा विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक हान सू ली यांनी व्यक्त केले.
n अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणमध्ये मोठय़ा प्रमाणात शेतजमीन होती. त्या जमिनीवर वेगाने शहरीकरण होत आहे. मोठमोठे टॉवर्स उभारले जात आहेत. त्यामुळे तापमान नियंत्रित ठेवणाऱया मातीच्या जमिनीची जागा सिमेंट काँक्रीटने घेतली आहे.