
आर्थर रोड कारागृहात त्वचारोग असलेल्या कैद्यांमुळे इतरांना त्याची लागण होऊ नये तसेच ज्यांना याचा त्रास आहे त्या कैद्यांवर वेळीच उपचार व्हावा यासाठी कारागृह प्रशासनाने शुक्रवारी आरोग्य शिबीर घेऊन त्वचारोगाने त्रस्त असलेल्या 432 कैद्यांवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले.
कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपीची रवानगी कारागृहात होते. बऱयाच आरोपींना वेगवेगळे आजार असतात. याची माहिती कारागृह प्रशासनाकडे असते. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. आर्थर रोड कारागृहात असलेल्या 432 कैद्यांना त्वचारोगाचा त्रास आहे. कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षात घेता त्वचारोगाची अन्य कैद्यांना लागण होऊ नये तसेच ज्यांचा त्वचारोगाचा त्रास होतोय त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावा यासाठी समता फाऊंडेशनच्या सहकार्याने शुक्रवारी कारागृहात त्वचारोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 432 कैद्यांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. त्या कैद्यांना चांगल्या प्रतीचे औषध देण्यात आले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने कारागृहातील अन्य कैद्यांना लागण होण्यापासून वेळीच रोखण्याबरोबर ज्यांना त्रास आहे त्यांना फायद्याचे ठरणार असल्याचे कारागृह अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले. इतक्या कैद्यांना उपचारासाठी मोठय़ा रुग्णालयामध्ये नेणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही संस्थेच्या मदतीने तज्ञ डॉक्टरांनाच कारागृहात आणून त्वचारोगाशी संबंधित कैद्यांवर उपचार केल्याचे वायचल म्हणाले.

























































