
सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मालेगाव महापालिकेतील काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता परभणी जिह्यातील सेलू नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह 24 विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवन कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.
परभणी जिह्यातील सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे व सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत, अविनाश काळे, भाजपचे जिंतुर तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख तसेच जिंतुर नगरपालिकेच्या चार विद्यमान नगरसेवकांनी व दोन जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यासोबतच नांदेडमधील भाजपचे नेते यादवराव जाधव यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रलोभने दाखवून पक्षात घेत नाही
आम्ही कोणालाही प्रलोभने दाखवून काँग्रेसमध्ये प्रवेश देत नाही. परभणी जिह्यातून मोठय़ा संख्येने इतर पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असून परभणी जिल्हा आत काँग्रेसमय झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.



























































