सोहळा-संस्कृती : सांस्कृतिक वारसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>निलय रमाकांत वैद्य

खजुराहो म्हणजे युनेस्कोने नोंदवलेले ‘जागतिक वारसा स्थळ.’ या ठिकाणी आजपासून ‘खुजराहो नृत्य समारोह’ सुरू होत आहे. सात दिवसांचा हा सप्तक महोत्सव. 48 व्या या महोत्सवाचा आरंभ नृत्य कलंदर पै. पंडित बिरजू महाराज यांना अर्पण करण्यात येत आहे. या वैशिष्टय़पूर्ण महोत्सवाविषयी…

नवगति, नवलय, ताल छन्दनव’ असं गुणगुणत आजपासून ‘खजुराहो नृत्य समारोह’ सुरू होतोय. उस्ताद अलाउद्दीन खाँ संगीत कला अकादमी आणि संस्कृती परिषद आयोजित या समारोहाचं यंदा 48 वं वर्ष. यंदाच्या समारोहावर भारतरत्न लतादीदी आणि नृत्य कलंदर पंडित बिरजू महाराज यांच्या निर्वाणाची शोक छाया पसरणं स्वाभाविक आहे. दीदींना जाऊन जेमतेम चौदा-पंधरा दिवस होतायत. महाराजांना जाऊन एक महिना उलटून गेला. या अतिव दुःख देणाऱ्या घटना आहेत. म्हणून या महारथी द्वयीला नमन करत आदरांजली वाहत यंदाच्या ‘खजुराहो नृत्य महोत्सवा’ची सुरुवात होत आहे. हे यंदाच्या ‘खजुराहो’चं वैशिष्टय़. हिंदुस्थानी शास्त्रशुद्ध नर्तनाच्या आणि एकूणच आपल्या देशाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या पटलावर आजचा दिवस या वैशिष्टय़ामुळे कायमस्वरूपी नोंदवला जाईल. आज स्व. पंडित बिरजू महाराजांचे शिष्यगण सादर करीत असलेल्या ‘कलाश्रमा’च्या नृत्यलयीने ‘खजुराहो’ची सुरुवात होत आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ‘खजुराहो’ची आणखी एक आपल्या महाराष्ट्रीय मनाला उभारी देणारी खासियत म्हणजे या सात दिवसांच्या समारोहात मुंबईची सोनिया परचुरे, टीना तांबे कत्थक आणि संध्या पुरेचा भरतनाटय़म सादर करणार आहेत. तसेच पुण्याच्या शर्वरी जेमिनीस, शमा भाटेचं कत्थक पेश केलं जाणार आहे. जिथे ही अदाकारी लयबद्ध होणार आहे, त्या खजुराहोला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं आहे. ‘खजुराहो’च्या आयोजकांनी हे या जागतिक महतीचं ठिकाण निवडून आपल्या देशाचा वारसा चांगल्या पद्धतीने जोपासला आहे. ही परंपरा गेली 48 वर्षे तेवत आहे.

आज सादर होणारं स्व. पंडित बिरजू महाराज यांच्या ‘कलाश्रम’ शिष्यगणांचं कत्थक विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. कारण बिरजू महाराजांची पट्टशिष्या सास्वती सेन आजच्या कलाकुसरीचं नेतृत्व करणार आहे. सास्वती स्वतः कत्थक निपुण आहे. शिवाय तिच्याकडे नृत्य आयोजनाचं नेतृत्व करण्याची हातोटी आहे. सास्वतीला जेव्हा संगीत कला अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता तो आपले गुरुवर्य पंडित बिरजू महाराजांना अर्पण केला. मला सास्वतीबरोबर यानिमित्ताने गप्पा मारण्याची संधी मिळाली. ती म्हणाली, ‘‘गुरुजी जाऊन नुकताच महिना झाला. आम्ही सर्वजण गुरुजींच्या निधनाच्या धक्क्यातून अजून सावरलेलो नाही. यातून आम्ही कधी बाहेर पडू असं वाटतही नाही. अशा परिस्थितीत ‘खजुराहो नृत्य समारोहा’त सहभागी व्हायचं की नाही अशा द्विधा मनःस्थितीत आम्ही होतो. पण आयोजकांनी आग्रह धरला. ‘खजराहो’चं व्यासपीठ हे महाराजांना श्रद्धांजली वाहण्याचं योग्य ठिकाण आहे. असं उमजल्यावर आमच्या मनाला उभारी आली. हे नृत्य नसून आमच्या महाराजांच्या चरणी आमची आदरांजली आहे.’’ यंदाच्या ‘खजुराहो’ नृत्य समारोहाची जुळवाजुळव सहा महिन्यांपासून सुरू झाली. त्या वेळी समारोहाची थीम कत्थक असणार हे ठरलं होतं. आता कत्थक थीम आहे म्हटल्यावर मार्गदर्शनासाठी बिरजू महाराजांशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कोण असू शकते. म्हणून आयोजकांनी लगेच महाराजांकडे धाव घेतली. त्या वेळी त्यांची तब्येत जेमतेम होती. ते म्हणाले, ‘मला स्टेजवर जायला जमेल की नाही माहीत नाही. पण मी जरूर प्रयत्न करीन. मी तुमच्या सोबत आहे.’ मग महाराजांशी सल्लामसलत करून समारोहाचा आराखडा तयार झाला. आयोजक त्यांना असंही म्हणाले की, तुम्ही इथे येताना तुमचा डॉक्टर घेऊन या. सर्व खर्च आम्ही करू. महाराज हे मान्य करतील, असा त्यांना स्वभाव नव्हता. त्यांच्या मनात फक्त ‘खजुराहो’विषयी संकल्पना नाचू लागल्या. त्यांना हुरूप आला, पण तब्येतीने घात केला. ‘खजुराहो’च्या नशिबी यंदा महाराज नव्हते. ते देहरूपाने नाहीत, पण आज त्यांचे शिष्यगण त्यांची अनुपस्थिती जाणवू देणार नाहीत याची खात्री आहे.

सास्वती म्हणाली, ‘‘आजच्या दिवसाचं वर्णन मी काय करू? मी माझी कला आज सादर करणार आहे. पण आज माझे गुरुजी हयात नाहीत. माझे गुरुजी अस्तित्वात नाहीत आणि माझं नृत्य सादर होतंय असं माझ्या आयुष्यात प्रथमच घडतंय. या विचाराने पोटात खड्डा पडतो. कालवा कालव होते. मग मी माझ्या मनाला समजावते. आज महाराज नाहीत, असं आपण का समजायचं. त्यांनी निर्माण केलेलं अवर्णनीय कत्थक विश्व, म्हणजे ते स्वतः आहेत. ते आपल्यातच आहेत. ते माझ्यात आहेत. आज माझी जबाबदारी वाढली आहे. गुरुजींनी कत्थक वृक्ष जोपासला. त्याचा पसारा सर्वदूर पसरला. तो घराघरात पोहोचला. त्या कल्पवृक्षाला जपणं ही माझी जबाबदारी आहे. त्याच्या एका पर्णालाही धक्का लागता कामा नये याकडे मला डोळय़ात तेल घालून काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी माझे गुरुजी ऊर्जा देत राहतील. त्या पर्वाची आज ‘खजुराहो’च्या शुभारंभाच्या दिवसापासून सुरुवात होत आहे. आज जर माझ्याकडून उत्तम कला सादर झाली तर गुरुजींना ती खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.’’

पंडित बिरजू महाराज पुण्यस्मरण नृत्यानंतर उद्या 21 फेब्रुवारीला सुजाता महापात्रा, निरुपमा राजेंद्र, जय रामाराव यांचं ‘समागम’ सादर होणार आहे. 22 फेब्रुवारीला नीता प्रसाद, पार्श्वनाथ उपाध्याय, टीना तांबे यांचं नृत्य सादर होणार आहे. 23 फेब्रुवारीला सोनिया परचुरे, पेरिस लक्ष्मी, कलमानंद सुनील, रागिणी नागर, दानुका आर्यवंश यांची कलाकृती पेश होणार आहे. 24 फेब्रुवारीला वसंत किरण, शर्वरी जेमेनीस, संध्या पुरेचा यांची अदाकारी पेश होणार आहे. 25 फेब्रुवारीला देविका देवेंद्र, एस. मंगलमुखी, नयनिका घोष यांचं नृत्य सादर होणार आहे आणि सांगता समारोपाच्या दिवशी 26 फेब्रुवारीला श्वेता देवेंद्र, क्षमा मालवीय, तपस्या, शमा भाटे यांची नृत्यकला होणार आहे. असा भरगच्च कार्यक्रम रसिक मनाची ‘लय’ अचूकपणे पकडेल यात शंका नाही.

– [email protected]