
>>दिव्या नेरुरकर-सौदागर
लहान वयात जवळच्या व्यक्तीच्या निधनाचा आघात मुलांना अंतर्बाह्य बदलवून टाकू शकतो. त्यांना गरज असते ती खंबीर आधाराची. अशी व्यक्ती टोकाचा विचार करण्याची शक्यता असते. दुःखात असलेली व्यक्ती जर एकदम अबोल झाली असेल, एकटी राहत असेल, अधिक काळ जर त्याच तीव्र दुःखात वरील सारी लक्षणे दाखवत असेल तर मानसोपचारांचा पर्याय त्या व्यक्तीला मदत करू शकतो.
‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार,
जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण,
तुका म्हणे बर्वे जन, व्हावे लहानहुनी लहान’
संत तुकारामांच्या या ओळी वाचल्यावर आपल्याला आपण लहानपणी केलेल्या गमती जमतींची आठवण आली असेल. मिश्कील, धांदरट, उपद्व्यापी किंवा मस्तीखोर अशी कितीतरी विशेषणं ही लहान मुलांना लागू पडतात. हल्ली शाळेत जाणाऱ्या मुलांचा अभ्यास, परीक्षा आणि प्रोजेक्ट्समध्ये पूर्णवेळ जात असतो.
बरीचशी मुलं ही घरी आणि शाळेत वेगळी असतात. म्हणजेच घरी शांत तर शाळेत बडबड करणारी, घरी धुडगूस तर शाळेत शिस्तीने वागणारी, पण चिन्मय (नाव बदलले आहे) असा नव्हता. तो घरी आणि शाळेतही अतिशय शांत असा मुलगा होता. तो आता पाचवीला होता. बाकावर एकटाच मान खाली घालून तो बसायचा.
सुरुवातीला त्याच्या वर्गशिक्षकांना त्याचे असे मान खाली घालून शांत बसण्याचे काही वाटले नाही. उलट त्याचा वर्ग इतका दंगेखोर होता की, चिन्मयचे शांत बसणे वर्गशिक्षक तसेच इतर शिक्षकांना आवडायचे. शिक्षक त्याचे उदाहरण इतर मुलांना सांगत. स्वतःचे इतके कौतुक ऐकल्यावरदेखील चिन्मयचा चेहरा काही बदलायचा नाही. तो तसाच इतर मुलांकडे चोरटय़ा नजरेने बघत शांत बसायचा. कुठल्याही शिक्षकाने त्याच्या चेहऱ्यावर हसू काही बघितले नव्हते.
पहिली टर्म अशीच गेली. दुसऱ्या टर्ममध्ये मात्र चिन्मयमध्ये अजून एक दखल घेण्याजोगा बदल त्याच्या वर्गशिक्षिकेला प्रकर्षाने जाणवला, तो म्हणजे आता चिन्मय बराचसा वेळ वर्गात झोपायला लागला होता. शाळेची वेळ ही सकाळची होती. त्यामुळे काही मुलांना डुलक्या यायच्यासुध्दा. मात्र चिन्मयची केस ही वेगळीच होती. तो भरपूर झोपायचा. त्याच्या घरी निरोप पाठवूनही त्याच्या घरचे भेटायला काही आले नव्हते आणि चिन्मयचे शाळेत झोपणे आता वाढत चालले होते. शेवटी त्याची केस समुपदेशनासाठी आली.
त्याला त्याच्या झोपेचं कारण विचारल्यावर तो फक्त ‘‘माहीत नाही’’ इतकच दबक्या आवाजात म्हणाला. त्याला बोलतं करणं हे सगळ्यात मोठे आव्हान होते. कारण चिन्मयच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारचे हावभाव बरेच दिवस दिसत नव्हते. वर्गातील इतर मुलांकडे आणि इतर शिक्षकांकडे त्याच्याबद्दल विचारले असता कोणीच अधिक माहिती देऊ शकले नाही. सगळ्यांनी मात्र एकच माहिती त्याच्याबद्दल सांगितली ती म्हणजे चिन्मय कुठल्याही मुलाशी बोलत नाही.
चिन्मय खरोखरच अबोल होता. त्याला बघूनच त्याच्यात उत्साहाचा अभाव आहे हेही समजत होते. तो स्वतःला व्यक्त करतच नव्हता. समुपदेशन सत्रांमध्ये त्याला काही गेम्स देऊन त्याच्या वागण्यात काही फरक पडतो का हे बघण्यात आलं. मात्र चिन्मय कुठलाही खेळ खेळायला रसही दाखवत नव्हता.
असेच काही दिवस गेले. समुपदेशनाला मात्र तो न चुकता यायचा आणि शांतपणे गोष्टीचे पुस्तक वाचायचा. वेळ संपली की, त्याच्या वर्गात निघून जायचा. त्याचा चेहराही कुठेतरी हरवलेला असायचा.
एकदा असाच तो सत्राला आला आणि त्याने ‘श्यामची आई’ पुस्तक पुन्हा एकदा वाचायला घेतले. ‘‘काय रे चिन्मय? हे पुस्तक तू वाचलंयस ना? मग पुन्हा तेच का?’’
‘‘असंच’’ तो हलकेच म्हणाला आणि माझ्यासमोर वाचायला बसला.
‘‘तू वर्गात इतर मुलांशी बोलत का नाहीस?’’
‘‘मला चिडवतात’’ पुन्हा दबक्या आवाजात उत्तर.
‘‘का?’’
‘‘मला आई नाही ना…. म्हणून’’ असं बोलून तो एकदमच गप्प झाला. त्याच्या अबोलपणाचं कारण आता समजलं होतं, तसंच त्याच्या झोपेचंही.
चिन्मय मनातून खूपच दुःखी होता आणि इतर मुलांच्या चिडवण्यामुळे कमालीचा दुखावला गेला होता. त्याच्या बोलण्यातून हेही कळलं की, त्याला वडीलही नव्हते. म्हणून त्याच्या आईने दुसरं लग्न केलं होतं, पण काही वर्षांत त्याची आईही वारली आणि तो त्याच्या सावत्र वडील तसेच भावंडांबरोबर राहत होता. चिन्मयला किती त्याच्या आईची आठवण येत असेल आणि तो चिडवण्यामुळे किती दुखावला गेला असेल याची कल्पनाच केलेली बरी! तो त्याचं दुःख नेमक्या शब्दांतही मांडू शकत नव्हता. कारण त्याचे परिपक्व वय नव्हते; पण ‘आपण मुलांच्या चिडवण्याला उत्तर देऊ शकत नाही. मग त्यांना टाळण्यासाठी झोप हा चांगला पर्याय’ ही समज मात्र त्या लहानग्या जीवाला आली होती.
मनाला आलेले नैराश्य किंवा ताण जेव्हा शरीराला असह्य होतं तेव्हा शरीर स्वतःला अधिकाधिक सावरायचा प्रयत्न करत असते त्याला मानसशास्त्रीय भाषेत ‘Fight or Flight Response’ असे म्हटले जाते. म्हणजेच एकतर ताणाला सामोरे जाणे (Fight) किंवा मग ताण टाळणे (Flight or fly away). चिन्मय त्याला आलेल्या ताणाला (मुलांचे चिडवणे) वर्गात झोपून आणि एकटं राहून सामोरे जात होता.
आता चिन्मयच्या उपचारांना दिशा मिळाली होती. त्याला मनातल्या दुःखाला आणि असुरक्षिततेला योग्य त्या रीतीने निचरा होण्यासाठी चिन्मयने त्याच्या आईला पत्र लिहिले. त्यात त्याने तो आईची किती आठवण काढत होता, त्याला त्याच्या आईला काय काय सांगायचं होतं हे सगळं त्याने लिहिलं.
तसंच त्याच्या वर्गातील काही मुले, शिक्षक या सगळ्यांनाही समुपदेशन प्रक्रियेत सामील करून घेतले गेले. ही प्रक्रिया जवळपास सहा महिने सुरू होती.
चिन्मय आता मानसिकरीत्या सुदृढ झाला होता याची पावती तेव्हा मिळाली, जेव्हा त्याच्या वर्गशिक्षिका उत्साहाने त्याच्याबद्दल सांगायला आल्या, ‘‘मॅडम, आज चिन्मयने एका मुलाशी मारामारी केली.’’
जवळच्या व्यक्तीचे आणि त्यातही आई/वडिलांचे छत्र हिरावून जाण्याचे दुःख हे असह्य असते. ‘आपण आता एकटे झालो. आपलं पुढे काय होणार?’ या आणि अशा नकारात्मक विचारांनी अधिकाधिक ताण आणि त्यापलीकडे येणारी अनिश्चिततेची भावना ही माणसाला आतून पोखरून टाकत असते आणि लहान वयात जर असा आघात झाला असेल तर तो मुलांना अंतर्बाह्य बदलवून टाकू शकतो.
अशा वेळेस अशा व्यक्तीस गरज असते ती खंबीर आधाराची आणि हा आधार त्या व्यक्तीच्या घरातली माणसे किंवा नातेवाईक अथवा मित्रमंडळी देऊ शकतात. कधी कधी अशी व्यक्ती टोकाचाही विचार करण्याची शक्यता असते. जर अशा प्रकारच्या दुःखात असलेली व्यक्ती जर एकदम अबोल झाली असेल, एकटी राहत असेल, नीट खात-पित अथवा झोपत नसेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ जर त्याच तीव्र दुःखात वरील सारी लक्षणे दाखवत असेल तर मानसोपचारांचा पर्याय त्या व्यक्तीला खचितच मदत करू शकतो.
शेवटी जन्म आणि मृत्यू या अटळ गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]


























































