60 व्या राज्य नाट्यस्पर्धांना सुरुवात; जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित साठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर उद्घाटन समारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार यांच्या हस्ते पार पडला. नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनानिमित्ताने मला माझे महाविद्यालयीन दिवस आठवले. त्यावेळी आमचा एक ग्रुप होता. आम्ही नृत्यस्पर्धेत सहभागी व्हायचो. मी नाटकात फक्त एकदाच काम केले. आमच्या फाउंडेशन कोर्सच्या वेळी नाटकात काम करण्याची संधी मिळाल्याचे डॉ. गर्ग यांनी यावेळी सांगितले. गो. जो. महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात राज्यनाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, गो. जो. महाविद्यालयाचे प्राचार्य पी. पी. कुलकर्णी, नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता केळकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आपल्या मनोगतात सहभागी झालेल्या सर्व संघांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी गो. जो. महाविद्यालयाच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. विविध क्षेत्रात महाविद्यालयाने चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनी अभिमान व्यक्त केला. नाट्यस्पर्धेचे उत्तम संयोजन केले असून या स्पर्धेतील सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता केळकर यांनी आपल्या मनोगतात सर्व नाट्यसंस्थांना आवाहन केले की, स्पर्धेच्या वेळी जर कोणाला काही अडचण आली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. ती अडचण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करु. ही स्पर्धा आपली सर्वांची आहे असे समजून काम करुया. यावेळी स्पर्धेचे संयोजक नंदकिशोर जुवेकर यांनी आभारप्रदर्शन केले. रत्नागिरीतील स्वा.वि.दा. सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून एकूण 7 नाट्यसंस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे जुवेकर यांनी सांगितले.

स्पर्धेचा ऑनलाईन शुभारंभ
राज्यातील 19 केंद्रांवर राज्यनाट्यस्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचा ऑनलाईन शुभारंभ मुंबई येथून पार पडला. हा शुभारंभ सर्व केंद्रावर झूम मिटींगद्वारे प्रसारीत करण्यात आला. या उद्घाटन समारंभाला राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अभिनेता नागेश भोसले आणि अधिकारीवर्ग उपस्थित होता. झूम मिटींगद्वारे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर सहभागी झाले होते. आपल्या मनोगतात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यनाट्यस्पर्धेमुळे राज्यात एक सांस्कृतिक चळवळ उभी राहिली. सामान्य घरातील कलाकारही राज्यनाट्यस्पर्धेमुळे रंगमंचावर आला. या नाट्यस्पर्धेने मराठी रंगभूमीला अनेक कलावंत दिल्याचे थोरात यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, राज्यनाट्य स्पर्धेतून लेखक आणि कलाकार समाजात जे काही घडते ते रंगमंचावर मांडण्याचा प्रयत्न करतात. याचा अनुभव नाटकाच्या नावावरून येतो. ही स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरु करणार होतो. पण कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे स्पर्धा पुढे ढकलल्याचे त्यांनी सांगितले.