
बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे सोमवारी रात्री घडली आहे. हिराबाई एकनाथ बढे (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे.
हिराबाई बढे या रात्री घराबाहेर निघाल्या असताना, दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गळ्याला बिबटय़ाच्या दातांच्या खोलवर जखमा झाल्या होत्या. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सागर माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक संतोष पारधी, एस. बी. सोनवणे यांनी घटनास्थळी व लोणी येथे धाव घेतली. बिबटय़ाने हल्ला केल्याने हिराबाई बढे यांच्या गळ्यावर खोलवर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वनपाल प्रशांत पुंड यांनी सांगितले. महिलेचा बळी घेणाऱया बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी मेंढवण ग्रामस्थांनी केली आहे.



























































