
>> राजेश चुरी
किल्ले रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू आहे. या कामात अनेक अडचणी येत आहेत, पण तरीही नेटाने ही कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रायगडावर सुरू असलेल्या कामातील आव्हाने व भविष्यातील योजनांचा हा आढावा.
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज किल्ले रायगडचे जतन व संवर्धनाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ‘स्वराज्याच्या राजधानीचा पुनर्शेध’ म्हणजे ‘रिडिस्कव्हरी ऑफ कॅपिटल कॉम्प्लेक्स’ या संकल्पनेवर केंद्रीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगडाचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. गडावरील ढासळलेले बुरूज पुन्हा उभारण्यापासून फरसबंद, तलाव, पाण्याच्या टाक्यांचे पुनरुज्जीवन होत आहे. रायगडाला पुन्हा ऐतिहासिक साज चढवण्याबरोबरच आधुनिक फसाट लायटिंग, लाईट अँड साऊंड शोचे काम किल्ले रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जतन व संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने या कामासाठी सुमारे 606 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 2018पासून जतन व संवर्धनाचे काम निरंतर सुरू आहे. या कामाची प्रगती दाखवण्यासाठी मुंबईच्या पत्रकारांनी किल्ले रायगडला भेट दिली तेव्हा रायगडचे संवर्धन करताना आता काळाला अनुसरून आधुनिक रोपवेची गरज या भेटीत प्रकर्षाने जाणवते. कारण आताचा रोपवे जुन्या काळातील आहे. अर्थात जेव्हा कोणी विचार केला नव्हता तेव्हा व्ही.एम. जोग या खासगी कंपनीने रायगडावर रोपवे बांधला हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आता ‘स्टेट ऑफ आर्ट’ रोपवे रायगडावर असावा अशी शिवभक्तांची इच्छा आहे. स्वित्झर्लंडला किंवा गुजरातच्या गिरनारमध्ये अत्यंत सुंदर रोपवे आहेत, त्या धर्तीवर रायगडावर रोपवे असणे आवश्यक आहे. रायगड विकास प्राधिकरण व सध्या अस्तित्वात असलेल्या जोग कंपनीने मिळून एक नवा रोपवे तयार करण्याचा प्रस्तावही प्राधिकरणाने दिला आहे.
राष्ट्रपतींना परवानगी नाकारली
रोपवेच्या बाबतीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद अलीकडच्या रायगडच्या दौऱयाच्या निमित्ताने पुढे आला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींनी रायगडाला भेट दिली तेव्हा सुरक्षा यंत्रणेने त्यांना या रोपवेमधून प्रवास करण्याची परवानगी नाकारली होती. यावरून हा रोपवे किती जुना झाला आहे याची कल्पना येईल. मध्यंतरी रोपवेमध्ये बिघाड झाला होता तेव्हा प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती काही काळासाठी रोपवेमध्ये अडकून पडले होते. सुरक्षा यंत्रणा व्हीव्हीआयपी लोकांना या रोपवेमधून परवानगी देत नाही. मग शिवभक्तांचे तरी जीव कशाला धोक्यात घालता! असा मुद्दा पुढे येऊ शकतो. डीपीआरनुसार नवीन रोपवेची किंमत 50 कोटी रुपयांच्या आसपास होते. मुख्य म्हणजे राज्य सरकारने रायगड विकास प्राधिकरणासाठी रोपवेकरिता 50 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. रोपवे करण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभाग (एएसआयची) परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी मिळण्यासाठी वर्षानुवर्षे थांबावे लागते. त्यामुळे नव्या रोपवेसाठी तातडीने हालचाल करण्याची गरज आहे.
चुनखडी आणि बेलफळाचा वापर
रायगड विकास प्राधिकरणाने रायगडाचे जतन व संवर्धनाचे काम हे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सुरू केले आहे. 2017मध्ये डीपीआर मंजूर झाला, त्यात चुन्याचे काम करण्यासाठीच मंजुरी मिळाली होती. सिमेट काँक्रीटचे कोणतेही काम करायचे नाही असे डीपीआरमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यानुसार काम सुरू आहे. संवर्धनाच्या कामात प्राधिकरणाचा स्पेशल सेल एक टक्काही सिमेंट वापरत नाही. शिवकाळात ज्याप्रमाणे चुनखडी, गूळ, बेलफळ, जवस, शिसे अशा वस्तूंचा गड उभारणीत वापर होत होता, तेच साहित्य आता संवर्धनाच्या कामात वापरले जात आहे. मात्र गडावरील राजवाड्याच्या परिसरात पुरातत्त्व विभागामार्फत काम सुरू आहे. त्या ठिकाणी सर्रास सिमेंट व मशिनरीचा वापर होत असल्याचे निदर्शनास येते, पण पावसाळ्यात धूप होऊ नये म्हणून सिमेंट वापरत असल्याचे स्पष्टीकरण पुरातत्त्व विभागाच्या वतीने देण्यात येते.
शिवकालीन मार्गाचे पुनरुज्जीवन
जतन व संवर्धनाचे काम करताना अतिशय बारकावे लक्षात घेतले आहेत. जगदीश्वराच्या मंदिरात जाण्याचा मार्गही बदलण्यात येत आहे. हिंदू धर्मात पूर्वेच्या बाजूने मंदिरात प्रवेश होतो, पण सध्या जगदीश्वराच्या मंदिराकडे मागील बाजूने भिवभक्त प्रवेश करतात. गडाचे स्थापत्य रचनाकार हिरोजी इंदूलकर यांनी रायगड बांधला आहे. त्यांनी मंदिराच्या बाहेर महाराजांच्या सेवेसाठी पहिला दगड रोवला. सध्या शिवभक्त मंदिर सर्व प्रथम पाहतात. मग हिरोजी इंदूलकर यांच्या नावाचा दगड बघतात. त्यामुळे शिवकाळात जसा पूर्वेकडून मंदिराचा मार्ग होता, त्याच पद्धतीने मंदिरात प्रवेशाचा मार्ग होईल. म्हणजे शिवभक्त सर्वप्रथम हिरोजी इंदूलकर यांनी त्यांच्या नावाने बसवलेला ‘ठेवेचे ठायी तत्पर’ हा संदेश वाचतील मग मंदिरात प्रवेश करतील.
गड उजळणार फसाट लायटिंगने
फसाट लायटिंगचा प्रयोग राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेस करतात तेव्हा हा सर्व परिसर अतिशय सुंदर दिसतो. आता कायमस्वरूपी फसाट लायटिंगचीही परवानगी मिळाली आहे. फसाट लायटिंगचा प्रस्ताव दोन वर्षे तांत्रिक परवानगीविना रखडला होता. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकारी अभियंत्याला झापले तेव्हा कामाला तांत्रिक परवानगीही मिळाली. यावर्षी जूनमध्ये रायगडावरील मुख्य वास्तू फसाट लायटिंगने उजळून जातील. रात्रीच्या वेळेस गडाचे विहंगम दृश्य दिसेल.
लाईट अँड साऊंड शो लाल फितीत
रायगडावर लाईट अँड साऊंड शो होणार आहे. त्याची टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. होळीच्या मैदानावरील खडकावर लोक बसतील आणि बालेकिल्ल्यावर लाईट अँड साऊंड शो दिसेल. त्याची क्रिप्ट शिवकाळाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी लिहिली आहे, पण ही क्रिप्ट फारच नाटयमय झाली आहे असा आक्षेप पुरातत्त्व विभागाने घेतला, पण शिवरायांचे संपूर्ण आयुष्य अतिशय नाटय़मय व आव्हानात्मक होते.
संभाजीराजे छत्रपतींना भेट नाकारली
केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तर स्वतःला कसे सर्वोच्च समजतात त्याचा किस्सा रायगडावर ऐकायला मिळतो. मध्यंतरी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती गडाच्या कामासाठी दिल्लीला केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात गेले होते. तेथील अधिकाऱयांनी संभाजीराजे छत्रपतींना ऑफिसच्या बाहेर बसवून ठेवले. भेटही दिली नव्हती. छत्रपतींना कार्यालयाच्या बाहेर बसवून ठेवण्याएवढी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱयांची मजल गेली आहे. संभाजीराजे छत्रपती सौम्य स्वभावाचे आहेत म्हणून त्यांनी या घटनेची फार वाच्यता केली नाही.
शिवरायांचे जीवन चरित्र मांडायचे असेल तर सर्व गोष्टी ओघानेच येणार, पण पुरातत्त्व विभागाच्या या आक्षेपामुळे क्रिप्टची मंजुरी रखडली आहे.




























































