
मुंबईतील चाळी, झोपडपट्टय़ांच्या ठिकाणी पालिका आता कंपोस्ट खत प्रकल्प उभारणार आहे. स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी प्रशासनाने आणखी एक प्रकल्प हाती घेतला आहे. नगरसेवकांच्या मागणीला पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतल्यास पालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवता येईल, असा अभिप्राय दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱयाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱया इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱयाच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनला प्रोत्साहन देण्यासाठी कचऱयाचे वर्गीकरण, ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱयाची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जल संधारण योजना राबविणाऱया सोसायटय़ा-आस्थापनांना करात सूट देण्यात येत आहे. त्यामुळे कचऱयाचे दिवसाचे प्रमाण सात हजार मेट्रिक टनांवरून साडेपाच हजार मेट्रिक टनांवर आले आहे.
…म्हणूनच घेतला निर्णय
मुंबईतील चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये नागरिक कचरा थेट रस्त्यावर टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि रोगराईचे संकट निर्माण होते. त्यामुळे चाळी-झोपडपट्टय़ांजवळ कंपोस्ट खत उभारण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती.
यावर पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये कचरा वर्गीकरण व कचरा व्यवस्थापन यासाठी स्थानिक स्तरावर लोकसहभागातून स्वयंसहाय्यित व स्वयंसंचालित जास्तीत जास्त संस्थांनी सहभाग घेण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.


























































