पाच वर्षांचा मुलगा झाला कॉन्स्टेबल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील कटनी जिह्यात पाच वर्षांच्या मुलाची हवालदार म्हणून नियुक्ती झाली आहे. या निरागस मुलाला पोलीस विभागात आता चाईल्ड कॉन्स्टेबल म्हटले जाईल. या काळात त्याला पगारही मिळणार आहे.

खरे तर 2017 साली पोलीस डय़ुटीवर असताना त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यानंतर या पाच वर्षांच्या मुलाला म्हणजे गजेंद्र मरकम याला अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळाली आहे. कटनीचे पोलीस अधीक्षक सुनील कुमार जैन यांनी अनुकंपा नियुक्तीपत्र दिले. तो मध्य प्रदेश पोलिसातील सर्वात लहान कॉन्स्टेबल ठरला आहे. पतीच्या निधनानंतर सविता मरकम यांनी गजेंद्रला पोलिसात अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावण्यासाठी खटाटोप केला.

18 वर्षांनंतर करणार काम

पोलीस अधीक्षकांनी सांगितले, चाईल्ड कॉन्स्टेबल गजेंद्र आता कोणतेही काम करणार नाही. तो अभ्यास करेल. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर, शैक्षणिक पात्रतेसह शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त केल्यानंतर चारित्र प्रमाणपत्राच्या आधारे कॉन्स्टेबल पदावर त्याची नियुक्ती केली जाईल.

पगार मिळणार

चाईल्ड कॉन्स्टेबलला सातव्या वेतन आयोगानुसार 19 हजार 500 रुपयांच्या निम्मे वेतन मिळेल. नियुक्ती पत्र देताना पोलीस अधीक्षकांनी त्याला विचारले, तू पोलिसात नोकरी करशील का, तेव्हा मुलाने हो म्हटले आणि हात जोडून नमस्ते केले. त्याच्या आईच्या डोळ्यांत अश्रू आले.