
महिलांच्या डब्यात चढण्यावरून झालेल्या वादातून चौघांनी होमगार्डला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नीलेश सकट आणि सुमित सकटला अटक केली असून अन्य दोघांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री महिलांच्या डब्यात पोलीस आणि होमगार्ड तैनात असतात. 27 फेब्रुवारीला कल्पेश कदम हे होमगार्ड विरार-चर्चगेट या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात डय़ुटीला होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लोकल दहिसर स्थानकात आली तेव्हा नीलेश हा महिलांच्या डब्यात शिरला तर त्याचे तीन सहकारी पुरुषांच्या डब्यात शिरले. तेव्हा कल्पेश यांना नीलेशला बोरिवली स्थानक आल्यावर उतरण्यास सांगितले. दारूच्या नशेत असलेल्या नीलेशने त्याच्या तीन सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्या चौघांनी कल्पेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार एका प्रवाशाच्या लक्षात आला. त्याने याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी गेले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा बोरिवली स्थानकात एक्स्प्रेसची वाट पाहत उभे असलेल्या त्या चौघांना ताब्यात घेतले. कल्पेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



























































