आमचे 170 मोहरे फोडून दाखवाच! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही कोणावर वार करीत नाहीत, पण वार केला तर आम्ही सोडणार नाही. महाविकास आघाडी सरकार पडणार अशा वावडय़ा उठवताहेत, पण आमची एकजूट हीच आमची ताकद आहे. तेव्हा आमचे 170 मोहरे फोडून दाखवाच, असे आव्हान देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, महाविकास आघाडीचे मोहरे मला सोडून तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत, अशा शब्दांत भाजपला ठणकावले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘रामटेक’ या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सापाच्या पिल्लाला तीस वर्षे दूध पाजले. तेच पिल्लू वळवळ करीत आहे आणि आमच्याविरोधातच फुत्कारत आहे. देशात अत्यंत घृणास्पद राजकारण केले जात आहे. एक विकृती फोफावत आहे. विकृतीपेक्षा अत्यंत खालच्या स्तरावर घाणेरडेपणा सुरू आहे.

सत्ता गेल्यावर अस्वस्थता

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणले आहे. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत आहे म्हणून सर्वांना अनेकांना अस्वस्थता आहे. सत्ता येते जाते पण कोणाला इतके अस्वस्थ होताना मी पाहिले नाही. सत्ता आली तर लोकांच्यासाठी काम करायचे असते आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते पण भाजपच्या लोकांचे वेगळे आहे.

ममता बॅनर्जींचा फोन

ईडीच्या धाडींचा उल्लेख करताना ते म्हणाले की, नवाब मलिक यांना अटक करण्यात आली त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मला फोन आला. त्या म्हणाल्या की, आमच्याडे चार लोकांना अटक झाली मात्र आम्ही हटलो नाही. लढलो संघटना वाढवली तुम्हीही तेच करा असे ममता बॅनर्जी यांनी मला सांगितले असे शरद पवार म्हणाले.

बांधिलकीशी तडतोड नको

नगरपंचायती निवडणुकीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने चांगली कामगिरी केली लोक तुमच्या बरोबर आहेत. लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे. त्यांच्याशी असलेल्या बांधिलकीशी तडतोड करायची नाही

युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही

युक्रेन रशिया युध्दाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, युनोमध्ये बैठक झाली तेव्हा हिंदुस्थान तटस्थ राहिला. आपण रशियाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. युक्रेनच्या बाजूने आपण भूमिका घेतली नाही म्हणून युक्रेनमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थी अधिक

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त विद्यार्थी अडकले आहेत. या संकटाकडे पेंद्रातील सत्ताधारी लक्ष देत नाहीत. पालक व विद्यार्थी प्रचंड त्रास सहन करीत असल्याबद्दल यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली. एकही पेंद्रीय मंत्री युक्रेन किंवा रशियामध्ये गेला नाही. केंद्र सरकारची चर्चेची तयारी नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी व आम्ही सर्व विरोधक चर्चेला तयार होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांची चिंता नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

हिंमत असेल तर दाऊदला शोधा

केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावरही उद्धव ठाकरे यांनी आसुड ओढले. ते म्हणाले, आज इकडे धाड पडतेय तर उद्या तिकडे धाड पडतेय. याला अटक करतात, त्याला अटक करताहेत; पण हे आपण खपवून घ्यायचे का? आता हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही असे ठणकावतानाच, तिकडे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाता, तिथल्या थडग्यांवर माथी टेकवता, मग एवढीच हिंमत आहे तर दाऊदला का शोधून आणत नाहीत ? त्याच्या मुसक्या का आवळत नाही, असा परखड सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.