
>> अजित कवटकर, [email protected]
आज ज्या प्रमाणात आपण आपल्या निष्काळजीपणामुळे अन्नधान्य वाया घालवत आहोत, ते जर बहुतांशी रोखलं, वाचवलं तर आजच्या उत्पादन क्षमतेत, सन 2050 च्या लोकसंख्येचीदेखील गरज भागवता येईल. जनजागृतीतून व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आपली अन्न सुरक्षिततेबाबतची उद्दिष्टं जर गाठू शकलो तर दुर्मिळतेच्या अंधकारात लोटल्या जाणाऱया असंख्य संसाधनांना आयु प्रदान करू, जैववैविध्य मोठय़ा प्रमाणात सुरक्षित राखू, पर्यावरणीय संकटांना दूर करू, उपासमार व कुपोषण मिटवू, महागाईला मर्यादेत ठेवू, जीवन अधिक सुंदर व निरोगी बनवू.
जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index – 2021)
यानुसार 116 देशांच्या यादीमध्ये हिंदुस्थान 101व्या स्थानावर घसरला. आपल्या शेजारील बांगलादेश, पाकिस्तान यांची याबाबतीतील स्थिती ही या निर्देशांकानुसार आपल्या तुलनेने चांगली असल्याचा निष्कर्ष यात आहे. जगभरातील बहुतांश राष्ट्रांना जरी ही समस्या कमी-अधिक प्रमाणात भेडसावत असली तरी आपल्या देशाचा घसरणारा क्रमांक हा येथील ‘उपासमार व कुपोषण’ यांच्या भयावह स्थितीचा अंदाज देणारा आहे. असं सगळं असतानादेखील मानवी उपभोगासाठी उत्पादित झालेल्या अन्नसाठय़ातील जवळपास एक तृतीयांश भाग हा वाया जात असतो. म्हणजेच कुणाच्याही मुखाला लागत नाही. याचाच अर्थ, आजच्या उपासमार / कुपोषण यामागील खरे कारण हे अन्नधान्याचा तुटवडा नव्हे तर याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वितरण, उपभोग यांतील नियोजन व व्यवस्थापनामध्ये असलेला मागासलेपणा, अज्ञान, असंवेदनशीलता, गरिबी आणि स्वार्थ. याच कर्मांचे एक फलित म्हणजे बेलगाम महागाई आणि त्याचाच प्रत्यक्ष परिणाम म्हणजे उपासमार, कुपोषण.
अन्नधान्याच्या नासाडीचे खापर जरी नैसर्गिक आपत्तींवर फोडण्याची सवय वा प्रथा रुजलेली असली तरी मानवी चुकाच या अपव्ययाला बहुतांशी कारणीभूत आहेत हे कोणीच नाकारणार नाही. रात्रीच्या भोजनपश्चात केलेल्या स्वयंपाकातील शिल्लक राहिलेलं थोडंबहुत अन्न हे अनेकदा फेकून दिले जाते. यातूनच वैयक्तिक पातळीवरदेखील अन्नाच्या बाबतीत न होणारे नियोजन दिसून येते. प्रत्येक घरातील हे अशा थोडय़ाथोडय़ाचे मोजमाप जर राष्ट्रीय वा जागतिक स्तरावर संकलित केल्यास ते प्रमाण किती महाकाय असेल, याचा आपण थोडा अंदाज बांधूच शकतो. एका संशोधनाअंती असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, आज जागतिक पातळीवर होणाऱया अन्नधान्य अपव्ययातील एकचतुर्थांश जरी वाया जाण्यापासून आपण वाचवू शकलो तरी, त्यातून अंदाजे 870 दशलक्ष लोकांच्या पोटाची खळगी भरता येईल.
एखादी गोष्ट स्वस्तात मिळते आहे म्हणून जर आपण ती भरमसाट घेत राहिलो तर ते वायाच जाणार. गरज नसतानादेखील विकत घेतलेला हा अतिरिक्त साठा पुढे न वापरता आल्यामुळे कालबाह्य झाल्यामुळे त्याला केराची टोपली दाखवली जाते. ही वृत्ती एके दिवशी संपूर्ण जगाला उपाशी मारेल. संसाधनांची दुर्मिळता लक्षात घेता वाया जाणाऱया अन्नधान्याबरोबर त्याच्या उत्पादनाकरिता लागलेले पाणी, मनुष्य व प्राणी शक्ती, ऊर्जा, भूमी, भांडवल हे सारं काही वाया जात असतं. शेतीसाठी जवळपास 70 टक्के पाणीसाठा वापरला जातो. निष्फळ जाणारे अन्नधान्य तयार करण्यासाठी लाखो गॅलन तेल लागलेले असते. अन्नधान्याच्या उत्पादनापासून उपभोक्त्याला ते पोहोचविण्यापर्यंतच्या सर्व कृतीतून अनेक हरितगृह वायू तयार होऊन वातावरणात उत्सर्जित होत असतात, शिवाय कचरा म्हणून ‘लँडफिल्स’मध्ये जाणारे अन्न आपल्या विघटन प्रक्रियेतून अनेक पर्यावरणघातक वायू वातावरणात फेकत असतात. त्यातूनच प्रकटलेले जागतिक तापमानवाढ व हवामान बदलाचे राक्षसी संकट आज या पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश करण्याची धाडसी चेष्टा करत आहे. तेव्हा इतकं सारं करून उत्पादित होणारं अन्नधान्य वाया घालवणं पाप / गुन्हा नाही का ?
देशात आजही बहुतांश शेती ही पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या तुलनेत या पद्धतीमध्ये शेतमाल वाया जाण्याचे प्रमाण अधिक असते. वैयक्तिक स्तरावर साठवणुकीसाठी वापरात असलेल्या अयोग्य पद्धती तसेच सार्वजनिक स्तरावरील गोदामांचा निकृष्ट दर्जा व त्यातील सेवा-सुविधांचा अभाव यामुळे या टप्प्यावर मोठे नुकसान होत असते. वितरण प्रक्रियेत विविध वाहतूक / वितरक माध्यमांमध्ये आवश्यक असणारा समन्वय व सुसूत्रता नसल्यास तेदेखील मोठय़ा गळतीस कारणीभूत ठरतात. किरकोळ विक्री व उपभोक्ता स्तरावर होणारी ‘अयोग्य पॅकिंग’ही याबाबतीत सर्वात जास्त घात करते.
आजच्या ‘पार्टी कल्चर’मध्ये रूढावलेल्या ‘फाय कोर्स’ अथवा ‘सेव्हन कोर्स मिल’च्या अट्टहासाला विरोध नाही, पण कार्यक्रमाच्या शेवटी अर्ध्याहून अधिक मेजवानी ‘बाट दो या फेक दो’चा दिसणारा बडेजाव दुःखद आहे. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीतील छोटय़ा परिवाराचा मोठा फ्रीजदेखील अक्षरशः फुटेपर्यंत तुडुंब भरलेला असणे अपव्ययाला कारणीभूत ठरतो. नाशवंत पदार्थांचे खरेदी प्रमाण नियोजनबद्ध नसल्यास त्यातील बहुतेक खराब होऊन फेकून देण्यास भाग पडते. घरी सात्त्विक – पौष्टिक जेवण तयार असतानादेखील बाहेर काहीतरी अरबट-चरबट ‘जंक फूड’ खाण्याच्या सवयीमुळे केलेला स्वयंपाक फेकून देण्याचे निमित्त ठरते. एकीकडे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे अन्न हे अशा प्रकारे वाया घालवून त्याचा अपमान करायचा, हे मनापासून व जाणीवपूर्वक थांबले पाहिजे. आज पृथ्वीवरील शेकडो, करोडो लोक पुरेशा अन्नाविना तडफडत आहेत, निदान याची तरी जाणीव अशावेळी ठेवली गेली पाहिजे.
आज ज्या प्रमाणात आपण आपल्या निष्काळजीपणामुळे अन्नधान्य वाया घालवत आहोत, ते जर बहुतांशी रोखलं, वाचवलं तर आजच्या उत्पादन क्षमतेत, सन 2050 च्या लोकसंख्येचीदेखील गरज भागवता येईल. जनजागृतीतून व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आपली अन्न सुरक्षिततेबाबतची उद्दिष्टं जर गाठू शकलो तर दुर्मिळतेच्या अंधकारात लोटल्या जाणाऱया असंख्य संसाधनांना आयु प्रदान करू, जैववैविध्य मोठय़ा प्रमाणात सुरक्षित राखू, पर्यावरणीय संकटांना दूर करू, उपासमार व कुपोषण मिटवू, महागाईला मर्यादेत ठेवू, जीवन अधिक सुंदर व निरोगी बनवू.




























































