
>> प्रशांत गौतम
महाराष्ट्रासह सर्वत्र मराठी भाषा दिन तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषाविषयक कार्यक्रम सुरू होते आणि त्याचदिवशी आघाडीचे लोकप्रिय लेखक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूलतज्ञ डॉ. सुहास जेवळीकर यांच्या अकाली निधनाची बातमी येऊन धडकली. सेवानिवृत्तीनंतर ते घाटी रुग्णालयाचे अधीक्षक होते, मात्र याच रुग्णालयात ते काही दिवसांपासून उपचार घेत होते. ऐन मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी या अष्टपैलू शैलीदार लेखकाने आपला निरोप घेतला.
एक सुहृद माणूस, दिलदार मित्र अकाली जाण्याचे दुःख तर आहेच. डॉ. जेवळीकर यांचे ‘ऐरणीच्या देवा’, ‘सभोवार’, ‘स्वास्थ्य संवाद’ (लेख – सदर लेखनाची पुस्तके) तसेच ‘निरोप’, ‘दहशतीची दैनंदिनी कवितासंग्रह’ असे मोजकेच, पण दर्जेदार साहित्य प्रकाशित आहेत. डॉ. जेवळीकर यांची ओळख भूलतज्ञ अशी वैद्यक क्षेत्रात आहेच. डॉक्टरकीचा पेशा जपताना त्यांना कितीतरी रुग्णांशी संबंध येत गेला. त्यातल्या त्यात (ऍनेस्थेशियातज्ञ -भूलतज्ञ) हे कार्यक्षेत्र म्हणजे अधिक जबाबदारीचे. आज या ऍनेस्थेशियात नवीन तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया सुलभ, सुकर होऊन ती कमी धोक्याची झाली आहे. अशा वेळी डॉक्टरचे आणि रुग्णांचे एक नाते निर्माण होत जाते. डॉ. जेवळीकर हे मुळातच संवेदनशील मनाचे, पण तज्ञ डॉक्टर असल्याने त्यांनी रुग्णांना दिलेली भूल, त्यांचा बरा केलेला आजार ही त्यांची त्यांच्या वैद्यक क्षेत्रातील कामगिरी नक्कीच महत्त्वपूर्ण समजली पाहिजे. त्या क्षेत्रात त्यांना आलेले अनुभव त्यांना साहित्य लेखनासाठी उपयुक्त ठरले. डॉ. जेवळीकर यांच्या मोजक्याच, पण दर्जेदार साहित्य कृतीत एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘ऐरणीच्या देवा’. साहित्य, कला, संस्कृती समाज आणि राजकारणाच्या क्षेत्रातील वृत्ती-प्रवृत्तीवर त्यांनी आपल्या चौफेर लेखणीने त्यांनी प्रहार केले. एकूणच त्यांच्या विनोदी आणि खुसखुशीत लेखनास शि. म. परांजपे यांच्यासारखी शैली लाभली होती.
‘ऐरणीच्या देवा’ या पुस्तकासाठी ब्लर्ब लिहिताना अशोक जैन जेवळीकर यांच्या लेखन निर्मितीच्या अनुषंगाने सांगतात, ‘‘ऐरणीच्या देवा हा संग्रह म्हणजे साहित्य क्षेत्रातील सोंगे आणि ढोंगे यांचा मिश्कील भाषेत परखड पंचनामा होय.’’ आणि जेवळीकरही आपल्या मनोगतात म्हणतात, ‘‘मराठी साहित्याचा मी कुणी अभ्यासक नाही, मात्र नुसता वाचक आहे.’’ साहित्याप्रती असलेल्या त्यांच्या चिंतनातून ते सातत्याने वेगळे लेखन करत असल्याचे जाणकारांना वाटत जाते. साहित्याचा वाचक हा संभाव्य लेखक असतो असे म्हणतात, ते डॉ. जेवळीकर यांच्या बाबतीत एकदम खरे आहे. ते साहित्याचे अभ्यासक आस्वादक तर होतेच, पण चोखंदळ वाचकही होते. ऐरणीच्या देवामधील काही लेखांची मजेदार शीर्षकं बघा, त्यावरून त्यांनी केलेल्या गमती-जमती आपल्या लक्षात येतात. ‘आभाळागत माया तुझी राहू दे’ हे मनोगत तसेच तिची दुर्दशा चोहीकडे, टीकाकारांचे अभयारण्य, आचारी व वाढपी, परळीचा औष्णिक उद्रेक, समीक्षकाच्या डोक्यातील खरूज व उवा, पुरस्कार, तिरस्कार, नमस्कार, लेखक कसे सापासारखे, ग्रामीण साहित्यातील आनंद व यादवी, मुंगी उडाली आकाशी, भालचंद्र नेमाडे यांचा वारकरी संप्रदाय, चिरेबंदी तटबंदी तोडणारा नाटककार, आता नवं काही तरी लिवा यांसारख्या शीर्षकांचे लेख वाचकांना, जाणकारांना नि अभ्यासकांना भारावून टाकतात. डॉ. जेवळीकर असे भारावून टाकणारे लेखक होते. त्यांच्या साहित्य संपदेस राज्य पुरस्कारासह इचलकरंजीच्या आपटे वाचनालयाचा इंदिरा संत पुरस्कार लाभला होता. संभाजीनगरात झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार होता. त्यांच्या अकाली जाण्याने साहित्यविश्वही हळहळले.




















































