
मोहाली येथे हिंदुस्थान विरुद्ध श्रीलंका दरम्यान कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीच हिंदुस्थानी संघाने प्रथम फलंदाजी करत 574 धावा कुटल्या. या सामन्यात रवींद्र जडेजाच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडला आहे. जडेजाच्या नाबाद 175 धावांच्या खेळीमुळे हिंदुस्थानने श्रीलंकेसमोर ५७४ धावांचा डोंगर उभा केला आहे.
दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाचे द्विशतक पूर्ण होण्यासाठी 25 धावा शिल्लक असताना कर्णधार रोहित शर्माने पहिला डाव घोषित केला. यामुळे फॅन्स मात्र रोहित शर्मावर नाराज झाले आहेत. यासंदर्भात सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
जडेजाने 17 चौकार आणि 3 षटकार ठोकून 175 धावा केल्या. जडेजा ज्या गतीने धावा करत होता ते पाहता त्याला अजून काही ओव्हर्स खेळायला मिळाल्या असत्या तर त्याने आपले द्विशतक पूर्ण केले असते. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत होत्या.
ट्विटरवर राहुल द्रविड ट्रेंड
2004 साली मुलतान येथे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकर नाबाद 194 धावांवर खेळात होता. त्यावेळेस कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित केला होता. द्रविडच्या या निर्णयामुळे प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला होता. यामुळे वाद निर्माण झाला होता. रोहितच्या निर्णयामुळे आज द्रविडची आठवण झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत होत्या. यामुळे ट्विटरवर राहुल द्रविड ट्रेंड होत होता.
फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 267 धावांची गरज
मोहाली टेस्टच्या दुसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेने 4 गडी गमावून 108 धावा केल्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 267 धावांची गरज आहे. दुसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेचे पथुम निसंका 26 आणि चरिथ असालंका 1 धावा करून नाबाद राहिले.




























































