
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात बारबालांचं नृत्य ठेवल्याची घटना घडली आहे. या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा सचिव या बारबालांसह अश्लील नाच करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली आहे.
ही घटना बिहारच्या गया येथील एका मंदिरात घडली आहे. गया येथील छोटकी डेल्हा परिसरात एक शिवमंदिर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिराच्या परिसरात बारबालांचा नाच ठेवण्यात आला होता. या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा सचिव अंकित कुमार हा देखील तिथे उपस्थित होता.
या नाचगाण्याच्या दरम्यान अंकितने बारबालांसोबत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्याचे हे चाळे तेथील काही उपस्थितांनी व्हिडीओत चित्रीत केले आणि व्हायरल केले. ते व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गहजब उडाला. स्थानिक रहिवाशांनी या विरोधात मोर्चा काढून थेट पोलीस अधिक्षकांचं घर गाठलं.
तिथे नागरिकांनी अंकित कुमार विरोधात लेखी तक्रार दाखल केली. या नंतर अंकितला मंदिराच्या सचिव पदावरून हाकलून देण्यात आलं आहे. मंदिराच्या परिसरात अश्लील नृत्याचं आयोजन करण्याची अंकितची ही पहिली वेळ नाही.
यापूर्वीही 31 डिसेंबर 2021रोजी अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता अंकितवर कायदेशीर कारवाई होणार आहे. अंकितवर या आधी मारहाण करणे आणि सोन्याची चेन हिसकावणे असे गुन्हे दाखल आहेत.
























































