
>> प्रा. सतीश कुमार
सागरी नियम आणि लोकशाही मूल्ये प्रस्थापित करण्यास सक्षम असलेली नवीन जागतिक व्यवस्था ‘क्वाड’मुळे तयार होऊ शकेल का, हा प्रश्न आहे. जागतिक व्यवस्थेतील बलाढय़ देशांचे प्रयत्न नेहमीच एकतर्फी असतात हे आपण विसरता कामा नये. म्हणजे, नियम कोणतेच नसतात; परंतु बडय़ा राष्ट्रांच्या कृतीच नियम बनवितात.
अलीकडेच मेलबर्न येथे क्वाड ग्रुप सदस्य देशांच्या म्हणजेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली आणि त्यात अफगाणिस्तान आणि म्यानमारसह अनेक गंभीर जागतिक मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात पाकिस्तान आणि चीन यांच्यातील ताज्या बैठकीवरही अप्रत्यक्ष मार्गाने चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र युक्रेनच्या मुद्दय़ावर हिंदुस्थानने मौन बाळगले. इतर अनेक जागतिक मुद्दय़ांवर एकमत झाले. उदाहरणार्थ, एक शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित इंडो-पॅसिफिक प्रदेश तयार करणे, कोरोना महामारीशी लढण्यासाठी भागीदारी धोरण आणि हामान संकटाला सामोरे जाण्यासाठी योजना. परंतु अखेर ही सगळी तयारी कुणाच्या विरोधात आहे, हा प्रश्नही भेडसावतोच. चीनला विरोध करण्याची गरज सर्वांना सारखीच आहे की, आपापसात मतभेद आहेत? जर आपण क्वाडचा हेतू आणि पाया समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या प्रासंगिकतेबद्दल चर्चा करणे अधिक महत्त्वाचे ठरेल, मात्र चीन याला केवळ प्रचारयंत्रणा म्हणत त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
ढोबळपणे सांगायचे झाल्यास ‘क्वाड’ ही चार देशांची संघटना आहे. त्यात हिंदुस्थान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश आहे. हे चार देश जगातील सर्वांत मोठी आर्थिक शक्तीदेखील आहेत. त्यांना आशिया पॅसिफिक प्रदेशात चीनची वाढती दादागिरी आणि प्रभाव नियंत्रित करायचा आहे. क्वाडबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, या संघटनेची संकल्पना 2007 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी औपचारिकपणे मांडली होती. तथापि, 2004 च्या हिंदी महासागरातील त्सुनामी काळात बाधित देशांना, विशेषतः जपानला मदत करण्याचे कारणही या संघटनेच्या स्थापनेशी जोडले जाते.
2012 मध्ये आबे यांनी हिंदी महासागरापासून पॅसिफिक महासागरापर्यंत सागरी सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान आणि अमेरिकेसोबत डेमोक्रॅटिक सिक्युरिटी डायमंड तयार करण्याचा मानस व्यक्त केला. कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नुकतेच क्वाड प्लस स्थापन केले आणि त्यात ब्राझील, इस्रायल, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम या देशांचाही समावेश केला. त्याचप्रमाणे ब्रिटनदेखील आता हिंदुस्थानसह जगातील दहा लोकशाही देशांसोबत युती करण्याचा विचार करीत आहे. त्याचे उद्दिष्ट चीनवरील अवलंबित्व कमी करतानाच या लोकशाहीवादी देशांच्या मदतीने सुरक्षित फाइव्ह-जी नेटवर्क तयार करणे हे आहे.
चीनला घेरण्यासाठी क्वाड वेगाने काम करीत आहे हे स्पष्ट आहे. तथापि, संघटनेची इतर उद्दिष्टेही आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील प्रादेशिक शक्तींचा प्रभावही नियमांच्या मर्यादेत ठेवण्याचेही एक उद्दिष्ट आहे. त्यात जपान आणि चीन हे दोन देश आहेत. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जपानने या मार्गाला आपल्या प्रभुत्वाखाली आणले होते. हाच प्रयत्न आज चीन करीत आहे. या भागात थेट प्रवेश मिळत नसल्याने अमेरिका त्रस्त आहे. त्यामुळे हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या भागीदार देशांच्या मदतीने या क्षेत्रात पाय रोवण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
दक्षिण चीन समुद्रात जपान आणि अमेरिकेला सर्वांत मोठे संकट जाणवत आहे. या प्रदेशासोबतच चीनने पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातही हालचाली वाढवल्या आहेत. जपानच्या सेनकाकू बेटाला चीनने लक्ष्य केले आहे. चीन तैवानसाठी अधीर असल्याने त्याला जपानलाही घेरावे लागत आहे. या भागात जपान आणि अमेरिकेची लष्करी आघाडी आहे. तैवानच्या बचावासाठी अमेरिकेलाही जपानच्या मदतीची गरज आहे. ऑस्ट्रेलिया हादेखील अमेरिकेचा प्रमुख मित्र असून दोघांमध्ये लष्करी सहकार्य आहे. मात्र हिंदुस्थान अद्याप या मोहिमेत सहभागी झालेला नाही. त्यामुळे चीनला घेरण्याबाबत चारही देशांचे विचार एकसारखे आहेत का, हा प्रश्नच आहे. भूतकाळात, विशेषतः कोरोना महामारीच्या काळात ऑस्ट्रेलिया चीनविरोधात जास्त आक्रमकता दाखवीत होता.
क्वाड ही लष्करी आघाडी बनावी या बाजूने हिंदुस्थान कधीही नव्हता आणि आजही नाही, तर उर्वरित तीन देश नाटोसारखी लष्करी संघटना बनविण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. हिंदुस्थानने नकार देताच तीन देशांची एक नवीन संघटना तयार झाली आणि ती ‘ओक्स’ नावाने ओळखली जाते. वस्तुतः चीनकडून सर्वाधिक त्रास हिंदुस्थानला सहन करावा लागत आहे. हिंदी महासागरात चीनची हेरगिरी सुरूच आहे. दक्षिण आशियात गटबाजी करून तो हिंदुस्थानविरोधी कारवाया करीत आहे. श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर, मालदीव, म्यानमार आणि बांगलादेशही चीनच्या निशाण्यावर आहेत. तरीही हिंदुस्थान इंडो पॅसिफिक हा लष्करी चकमकींचा तळ बनू देऊ इच्छित नाही.
भूगोल हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. हे चार देश पृथ्वीच्या वेगवेगळय़ा भागांत वसलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा आणि शत्रुत्वाची कारणे वेगळी आहेत. अशा परिस्थितीत ‘क्वाड’ एक मजबूत युनिट म्हणून काम करू शकेल असे दिसत नाही, विशेषतः चीनला प्रतिकार म्हणून! वस्तुतः चीनचा व्यापारी विस्तार ही या चारही देशांची समान डोकेदुखी आहे. सागरी नियम आणि लोकशाही मूल्ये प्रस्थापित करण्यास सक्षम असलेली नवीन जागतिक व्यवस्था क्वाडमुळे तयार होऊ शकेल का, हा प्रश्न आहे. जागतिक व्यवस्थेतील बलाढय़ देशांचे प्रयत्न नेहमीच एकतर्फी असतात हे आपण विसरता कामा नये. म्हणजे, नियम कोणतेच नसतात; परंतु बडय़ा राष्ट्रांच्या कृतीच नियम बनवितात. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनने जे केले ते अमेरिका गेल्या शंभर वर्षांत करीत आहे आणि आता चीनही तेच करीत आहे.
चीनवर नियंत्रण ठेवता येणार नाही असे नाही. क्वाडला हवे असल्यास हिंदुस्थानला मजबूत बनवून संघटना हे काम करू शकते. त्यासाठी अमेरिकेसह इतर देशांना मूलभूत विचारसरणी बदलावी लागेल. तिबेट ही चीनची सर्वांत दुखरी जखम आहे. चीनच्या क्षेत्रफळाच्या 35 टक्के क्षेत्र तिबेटचे आहे. चीनची सीमा तेथेच हिंदुस्थानला मिळते. त्यामुळे ध्रुवीकरण हे दक्षिण चीन समुद्राबाबत न होता ते तिबेटबाबत व्हावे. परंतु यात अमेरिकेला आणि जपानला अडचणी जाणवतील आणि त्यामुळे ही बाब ते कधीच मान्य करू शकत नाहीत. हिंदुस्थानसाठी स्वतःचे हित अधिक महत्त्वाचे आहे. शत्रू एक परंतु त्याच्या सावलीची लांबी चौघांसाठी भिन्नभिन्न अशी अवस्था क्वाडच्या बाबतीत दिसून येते, आणि हीच सर्वांत मोठी समस्या आहे.
(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत)






























































