
‘मनपा प्रशासन म्हणजे अलिबाबा 40 चोरांसारखे झाले आहे. पदाधिकाऱयांचा सन्मान कोणालाही राहिलेला नाही. काम कसे टाळायचे व कसे हाणून पाडायचे, हे अधिकाऱयांना जास्त कळते. तुम्ही स्वतःला जास्त शहाणे समजू नका. तुम्ही आम्हाला काम करू देणार नसाल, तर आम्हीही तुम्हाला काम करू देणार नाही,’ अशा शब्दांत स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी प्रशासनाची खरडपट्टी काढली. ‘स्थायी समितीच्या बैठकांना कारणाशिवाय गैरहजर राहणाऱयांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करा,’ असा आदेशही वाकळे यांनी नगरसचिव एस. बी. तडवी यांना दिला.
स्थायी समितीचे सभापती झाल्यावर कुमारसिंह वाकळे यांनी आज सभा घेतली. सभेत शेवटचा विषय चर्चेला यायचा होता. त्यावेळी अचानक सभापती वाकळे यांनी ‘मला बोलायचे आहे,’ असे म्हणत प्रशासनावर आरोपांचे शरसंधान सुरू केले. नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनीही त्यांना साथ देत प्रशासनाचे वाभाडे काढले. अखेर अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी स्थायी समिती बैठका टाळणारे अधिकारी व विभागप्रमुखांवर कारवाईचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याची सूचना नगरसचिव तडवी यांना दिली.
सभापती वाकळे म्हणाले, ‘स्थायी समिती सभेस आयुक्तांची उपस्थिती गरजेची नसल्याचे सांगितले जाते; पण कोणाची उपस्थिती हवी, हे का सांगितले जात नाही? मनपा आवारात हिंडणारे उपायुक्त यशवंत डांगे आज अचानक आजारपणाच्या रजेवर कसे गेले? त्यांनी ‘स्थायी’ची परवानगी घेतली का? अनेकजण सभेला उशिरा येतात. त्यांच्याकडे विषयाची पुरेशी माहितीही नसते. मग प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय? असा सवाल केला. वडय़ाचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रकार मनपात होतात. आपल्यापेक्षा अधिकारीच जास्त राजकारण करतात. चांगले काम करणाऱयांना बाजूला ठेवले जाते. काम करायचे की नाही? असे सांगत अधिकारीच नगरसेवकांना ब्लॅकमेल करतात,’ असा रागही त्यांनी व्यक्त केला. ‘मात्र, यापुढे असे चालणार नाही, असा दम देत प्रशासनाने जबाबदारीने काम करावे,’ अशी सूचना केली.
या बैठकीस नगरसेवक पाऊलबुद्धे, मुदस्सर शेख, समद खान, सचिन शिंदे, गणेश कवडे, प्रशांत कांबळे, प्रशांत गायकवाड, रवींद्र बारस्कर, गौरी ननावरे, मंगल लोखंडे उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे, शहर अभियंता सुरेश इथापे, यंत्र अभियंता परिमल निकम आदींनी अजेंडय़ावरील विविध विषयांची माहिती दिली. या बैठकीत पाच हजार वृक्षलागवड, आरोग्य विभागासाठी सक्शन मशिन खरेदी, शहर बस वाहतूक थांब्यांची रंगरंगोटी, जुन्या 32 वाहनांचा लिलाव यांसह विषय मंजूर करण्यात आले.
हसून स्वागत केल्याबद्दल आभार!
z ‘स्थायी समितीत आठ नवे सदस्य आणि सभापतीही नवे आले आहेत. किमान पहिल्या सभेत नवे सभापती व सदस्यांचे प्रशासनाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला पाहिजे होते. त्यासाठी मी पैसे दिले असते. प्रशासनच पदाधिकाऱयांचा सन्मान ठेवत नाही. तरीपण सभागृहात आल्यावर सर्वांनी माझे हसून स्वागत केले, याबद्दल आभारी आहे,’ असा उपरोधिक टोला सभापती वाकळे यांनी लगाविला. या टोलेबाजीची चर्चा मनपा परिसरात होती.





























































