
मानवी वस्त्यांमधील बिबटय़ांची घुसखोरी ही गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय बनली आहे. बिबटय़ांचे भक्ष्य, त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी त्यांची घनता आदींबाबत वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन सोसायटी-इंडियाने (डब्लूसीएसआय) संशोधन केले. त्यात असे दिसून आले की, तुंगारेश्वर अभयारण्यातील बिबटे हे भटक्या कुत्र्यांवरच जगत आहेत. दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ांना मात्र शिकारीची कमी नाही. भटक्या कुत्र्यांबरोबच अन्य प्राणीही त्यांची मेजवानी बनतात.
डब्लूसीएसआयने वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (डब्लूआयआय) आणि महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने हे संशोधन केले. वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे, संबंधम सत्यकुमार, कल्याणसुंदरम संकर, देवचरण जथन्ना, विकास गुप्ता आणि विद्या अथ्रेया हे या संशोधनात सहभागी झाले होते. त्यांचा संशोधन अहवाल ‘शहरातील बिबटे-संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, मुंबईतील दोन संरक्षित क्षेत्रे आणि त्यालगतची कथा’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला.
हे संशोधन 2015 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तर 2016 मध्ये तुंगारेश्वर अभयारण्यात केले गेले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ांची घनता अधिक आढळली. तिथे 100 किलोमीटरच्या परिसरात 26 बिबटय़ांचा वावर होता. त्या परिसरात माणसांची लोकसंख्या दोन हजार इतकी होती. त्या तुलनेत तुंगारेश्वरमध्ये बिबटय़ांची घनता अगदीच कमी आढळली. तिथे 100 किलोमीटरच्या परिसरात 5 बिबटे आणि माणसांची लोकसंख्या 1700 इतकी होती.
z बिबटय़ांचे भक्ष्य काय असेल? त्यात पाळीव आणि जंगली प्राण्यांचे प्रमाण किती? हे जाणून घेण्यासाठी या दोन्ही अभयारण्यात सापडलेल्या बिबटय़ांच्या केसांचे नमुने संशोधकांनी तपासले. त्यात असे दिसून आले की तुंगारेश्वरमधील बिबटय़ांचे 66.76 टक्के खाद्य हे भटके कुत्रे आहेत. दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे हे भटक्या कुत्र्यांवर फक्त 32.01 टक्केच अवलंबून होते. कारण तुंगारेश्वरच्या तुलनेत त्यांना शिकारीसाठी हरणे, डुक्कर, ससे आदी प्राणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपलब्ध आहेत. तुंगारेश्वरच्या जंगलात त्या प्राण्यांची संख्या कमी आहे असे निकीत सुर्वे यांनी सांगितले.
सर्व प्रकारचा मांसाहार करणाऱया बिबटय़ाने आपल्याला नेहमीच भुरळ घातली आहे. या अभ्यासानंतर अधिक संशोधन करण्याचे नवीन मार्ग खुले झाले आहेत.
z डॉ. एस. सत्यकुमार
शहरी जीवन जगण्यासाठी अनुकूल झालेल्या बिबटय़ांचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरेल. या संशोधनामुळे आम्हाला दोन संरक्षित क्षेत्रांतील व्यवस्थापन समस्या चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत झाली.
z विकास गुप्ता, तुंगारेश्वर अभयारण्य संचालक
बिबटय़ांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही संशोधन कार्य पुढे चालू ठेवू. या संशोधन कार्याचा एक भाग म्हणून आम्ही आमच्या रेडिओ-कॉलर बिबटय़ांच्या दैनंदिन हालचाली आणि क्रियाकलापांचे निरीक्षण करत आहोत.
z मल्लिकार्जुन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक




























































