
माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी झालेल्या संभाषणाबाबत सीबीआयने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सहा तास चौकशी केली. पांडे यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
अॅण्टेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर परमबीर सिंह यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी करून त्यांची गृहरक्षक विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे असताना त्यांचे परमबीर यांच्यासोबत या प्रकरणाशी संबंधी फोनवरून संभाषण झाले होते. देशमुख यांच्याविरोधात लिहिलेले पत्र मागे घ्या, जर तसे नाही केले तर माझ्याविरोधात आणखी गुन्हे दाखल केले जातील असे पांडे यांनी म्हटल्याचे परमबीर यांची तक्रार होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱया सीबीआयने संजय पांडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी पांडे यांचा जबाब नोंदवून घेण्यात आल्याचे समजते.































































