मुद्दा – पाणी अडवा, साठा वाढवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ज्ञानेश्वर भि. गावडे

1972च्या मोठय़ा दुष्काळानंतर अनेक दुष्काळग्रस्त देशोधडीला लागले. अजूनही त्यातील बरेच जण पुणे, मुंबई आदी लहानमोठय़ा शहरांत झोपडय़ांमध्ये आयुष्य काढत आहेत. कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ, कधी गारांचा पाऊस, अवकाळी पाऊस असे वर्षभर चालूच असते. देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त नद्या, नाले, खाडी असे नैसर्गिक स्रोत आहेत. तरीही भाग जलसंधारण होत नाही. पाऊस साठवून घेणाऱया मोकळय़ा जागा अलीकडे कमी होत आहेत. दरवर्षी महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने देशात अव्वल क्रमांक लागतच असतो. ‘शहरे ताडमाड, खेडी उजाड असे महाराष्ट्राचे चित्र कायमचे झालेले आहे. नवे सरकार आले की, महाराष्ट्राचा पाणीसाठा वाढविण्याचे जलसंधारण विभागाला आदेश देत असते. जलसाठा व जलसिंचन विभागाला जलनियमनाचे डोस पाजते, मोठमोठे जल प्रकल्प आखते, त्यात अमाप खर्च करते. नद्यांची विपुलता जरी महाराष्ट्रात असली तरी नर्मदा, तापी, वैतरणा, सूर्या, उल्हास यांसह काही पश्चिमवाहिनी नद्या पूर्व घाटातील पाऊस अरबी समुद्रात नेऊन टाकतात. महाराष्ट्राला सातशे तीस किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. त्याच्या काठावर असणाऱया बहुसंख्य खाडय़ांमधील पाणी आणि खोरे प्रकल्प वाढवले तरी शेवटी पाणी समुद्रातच म्हणजे पश्चिमेकडेच वळते. पूर्वेकडील जाणारे पाणी पश्चिमकडेच वळविणारे कोयनासारखे प्रकल्प उभारले तर महाराष्ट्राची जलसंधारण स्थिती निश्चितच सुधारण्यासारखी आहे.