वीर जवान रामेश्वर काकडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमधील रायपूर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले रामेश्वर वैजिनाथ काकडे यांच्यावर बार्शी तालुक्यातील गौडगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यरात्री मूळ गाव गौडगाव येथे झालेल्या अंत्यसंस्कारांवेळी वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खे गाव लोटले होते.

बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे राहणारे रामेश्वर वैजिनाथ काकडे हे ‘बीएसएफ’मध्ये कार्यरत होते. रायपूर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी मध्यरात्री त्यांचे पार्थिव गौडगाव येथे आणण्यात आले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वैजिनाथ काकडे यांनी मुखाग्नी दिला.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत यांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

‘ती’ भेट ठरली अखेरची

रामेश्वर काकडे 2012 साली ते ‘बीएसएफ’मध्ये रुजू झाले होते. एक महिन्यापूर्वी रामेश्वर काकडे 15 दिवसांसाठी सुट्टीवर आले होते. ही भेट त्यांची अखेरची ठरली. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी व दोन महिन्यांचे बाळ असा परिवार आहे. यावेळी अख्खे गाव त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते.