नगर झेडपीकडून मार्चअखेर अवघा 51 टक्के निधी खर्च, 15 दिवसांत 175 कोटी खर्च करण्याचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांची मुदत संपत आलेली आहे. दुसरीकडे, मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची बदली झाली आहे. असे असताना, जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीपैकी 49 टक्के निधी अजून अखर्चित असून, ही रक्कम 175 कोटींच्या जवळपास आहे. मार्चअखेर हा निधी खर्च करण्याची मुदत असून, केवळ 15 दिवसांत निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2020-21 या वर्षात जिल्हा परिषदेला 361 कोटी 43 लाखांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी मार्च 2022अखेरपर्यंत खर्च करण्याची मुदत आहे. मात्र, 11 मार्च 2022पर्यंत यातील 186 कोटी 48 लाख म्हणजे 51.59 टक्के एवढाच निधी खर्च झालेला आहे. पुढील 15 दिवसांत उर्वरित तब्बल 175 कोटी रुपये खर्च कसे करणार? असा प्रश्न असून, त्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल 20 मार्चला संपत आहे. 21 मार्चपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाकडे जाईल. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील.

मात्र, नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांची बदली झाली आहे. त्यामुळे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे हे कामकाज पाहत आहेत. गेल्या वर्षभरात प्राप्त निधीपैकी केवळ 51.59 टक्के निधी खर्च झाला. त्यामुळे आता उर्वरित जवळपास 49 टक्के निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे; अन्यथा हा निधी मार्चनंतर शासनाला परत पाठवावा लागणार आहे. मागील वर्षी सुमारे 85 ते 90 टक्के निधी खर्च झाला होता. तरीही 37 कोटींचा निधी शासनाकडे परत गेला होता. यंदा त्यात वाढ होते की घट, हे मार्चअखेरच समजणार आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेत मार्चअखेरपर्यंत निधी खर्च न झाल्याने शासनाला निधी परत करण्याची वेळ आलेली असून, ही परंपरा यंदादेखील कायम राहण्याची चिन्हे आहेत.

विभाग                     अखर्चित निधी
आरोग्य                  36 कोटी 49 लाख
बांधकाम (दक्षिण)      35 कोटी 87 लाख
प्राथमिक शिक्षण        28 कोटी 95 लाख
बांधकाम (उत्तर)       24 कोटी 66 लाख
पाणीपुरवठा             18 कोटी 1 लाख
महिला-बालकल्याण    11 कोटी 91 लाख
लघुपाटबंधारे             9 कोटी 56 लाख
कृषी विभाग              7 कोटी 34 लाख
समाजकल्याण            6 कोटी 28 लाख
ग्रामपंचायत               6 कोटी 15 लाख
पशुसंवर्धन                5 कोटी 81 लाख
एकूण                 174 कोटी 95 लाख