
आगरकरमळ्याजवळील रेल्वे पुलाखाली कोतवाली पोलिसांनी कारवाई करीत गावठी कट्टय़ासह तलवारी आणि धारदार हत्यारे जप्त केली. बुधवारी (दि. 16) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या या सहाजणांना पोलिसांनी गजाआड केले असून, दोघे पसार झाले आहेत.
सुनीलसिंह जीतसिंह जुन्नी (वय 27), आझाद लक्ष्मण शिंदे (वय 23), शंकर अशोक पंडित (वय 32), सागर दिनेश बिनोडे (वय 26), आकाश अगस्तीन आढाव (वय 22, सर्व रा. संजयनगर, काटवन खंडोबा), संतोष रमेश पंडित (वय 25, रा. सागर कॉम्प्लेक्स, आगरकरमळा, स्टेशन रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रेल्वे पुलाखाली अंधारात काही इसम धारदार शस्त्र व इतर साहित्य घेऊन दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्रित जमले आहेत, अशी माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक मनोज महाजन व गुन्हे शोध पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून वरील सहाजणांना पकडले. मात्र, यावेळी दोनजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
या कारवाईत 35 हजार 450 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 1 मॅगझिन व 1 जिवंत काडतूस, तसेच 95 हजार 650 रुपये किमतीच्या तीन दुचाकी, एक चाकू व रोख रक्कम, मिरची पावडरचा स्प्रे, दोन तलवारी, दोन कोयते, मिरचीपूड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस नाईक गणेश धोत्रे, सलीम शेख, नितीन शिंदे, सागर पालके, संतोष गोमसाळे, योगेश भिंगारदिवे, योगेश वकाष्टे, राजू शेख, कॉन्स्टेबल अभय कदम, दीपक रोहवले, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, अतुल काजळे, संदीप थोरात, याकूब सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली.




























































