
>> प्रा. मिलिंद जोशी
मराठी रंगभूमीच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 20 मार्च रोजी होत आहे. त्या निमित्ताने…
किर्लोस्कर, देवलांपासून उदय पावलेली आणि खाडिलकर-गडकरींच्या काळात ऐश्वर्यसंपन्न झालेली मराठी रंगभूमी मूकपट आणि बोलपटनिर्मितीच्या आरंभ काळात मोडकळीस आली होती. नाटक कंपन्या बंद पडल्या होत्या. नट बेकार झाले होते. प्रेक्षक सिनेमाकडे वळले होते. अशा काळात मराठी रंगभूमीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम नाटककार आचार्य अत्रेंनी केले. 1950 नंतर रंगभूमीची ही समृद्धी टिकवून ठेवण्याची आणि त्यात मोलाची भर घालण्याची महत्त्वाची कामगिरी वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे. चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर या नाटककारांनी केली. व्यामिश्र मानवी जीवन व्यवहारातल्या घटनाप्रसंगातली तत्कालिकता बाजूला ठेवून उत्कटता कायम राखणारे रचनाकौशल्य, उत्तम प्रयोगनिर्मिती मूल्ये आणि प्रेक्षकाभिरुचीचे भान या गुणवैशिष्टय़ांमुळे कानेटकरांची कारकीर्द नाटककार म्हणून यशस्वी ठरली.
त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा. रविकिरण मंडळातील ज्येष्ठ सदस्य कवी गिरीश यांचे चिरंजीव असलेल्या वसंत कानेटकरांना साहित्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. कानेटकरांनी जेव्हा लेखनास प्रारंभ केला तेव्हा प्रा. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर आदी लेखकांच्या कथा-कादंबऱ्यांचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात होता. कानेटकरांसारख्या नव्या होतकरू लेखकाला लेखनाच्या संदर्भात तो काळ आव्हानात्मच होता, परंतु कानेटकरांनी नाटय़ लेखनापूर्वी कादंबरी लेखन केले. ते फडके-खांडेकरांच्या वाटचालीचे नव्हते. आल्बेर कामू, सार्त्र यांच्या संदर्भातले होते. त्यांच्या ‘घर’ आणि ‘पोरका’ या दोन कादंबऱ्या त्याच्या साक्षी आहेत.
‘वेडय़ाचे घर उन्हात’ हे त्यांचे पहिले नाटक. त्या नावाची एक कथा त्यांनी किर्लोस्कर मासिकात लिहिली होती. कानेटकरांचे हे पहिले नाटक पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रमॅटिक असोसिएशन या नाटय़ संस्थेने केले. या नाटकापासून पीडीए आणि कानेटकर यांच्या नाटय़वाटचालीतील एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. ‘वेडय़ाचे घर’च्या पार्श्वभूमीवर कानेटकरांनी ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देवांचे मनोराज्य’ ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ असे वेगळ्या स्वरूपाचे नाटय़लेखन केले. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक कानेटकरांच्या लेखनप्रवासातील जसा एक मानबिंदू आहे तसंच एकूण मराठी सुखात्मिका, नाटय़लेखनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या त्यांच्या ऐतिहासिक नाटकाने प्रयोगसंख्येचे उच्चांक निर्माण केले आणि वसंत कानेटकर हे व्यावसायिक नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘तुझा तू वाढवी राजा’, ‘जिथे गवतास भाले फुटतात’, ‘आकाशमिठी’ आणि नंतरच्या काळात ‘गरुडझेप’ ही ऐतिहासिक विषयावरची नाटके कानेटकरांनी लिहिली.
संगीत नाटक लिहिण्याचे कानेटकरांचे स्वप्न ‘मत्स्यगंधा’ या नाटकामुळे सफल झाले. अभिजात संस्कृत आणि मराठी नाटकांचा वारसा स्वीकारत पारंपरिकता आणि नवता यांचा सुमेळ सांगीतिक अंगांनी या नाटकात सिद्ध झाला. ‘गुंतता हृदय हे, नको विसरू संकेत मिलनाचा, साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची, गर्दसभोती रानसाजणी तू तर चाफेकळी आदी रचना हे या नाटकाचे सांगीतिक वैभव. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना सुखावणारे ठरले. ‘मीरा-मधुरा’ या नाटकात त्यांनी पारंपरिक पद्धतीने संत मीराबाईंचे चरित्रगान नाटकात मांडले नाही तर तिच्या श्रीकृष्णप्रीतीचा-भक्तीचा, आंतरिक नात्याचा वेध घेतला.
कानेटकरांनी इतिहास, पुराणातील व्यक्तिरेखा जशा नाटय़ विषयांसाठी निवडल्या तशाच समाज वास्तवातील किंवा नजीकच्या इतिहासकाळातील परिचित व्यक्तीही निवडल्या. त्यामध्ये बाबा आमटे, हिराबाई पेडणेकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, इतिहासाचार्य राजवाडे, बालकवी यांची निवड केली. त्यातून हिमालयाची सावली, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतंय, विषवृक्षाची छाया यासारखी नाटके लिहिली. या नाटकांचा गौरव करताना वि. स. खांडेकर म्हणतात, ‘वाईट आणि चांगले यांच्या संघर्षापेक्षा चांगलं आणि अधिक चांगलं यांचा संघर्ष अधिक चांगला असतो. तो रंगविणेही कठीण असते. ते आव्हान कानेटकरांनी स्वीकारले आणि पेललेही.’ नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘कलांचा व्यवहार संपूर्णपणे जीवनाचा आरसा कधीच नसतो. इतिहासात घडलेल्या घटनांचे अनुकरण करण्यापेक्षा कलावंतांना दुसरेच ध्येय गाठायचे असते. घटनांच्या सत्यापेक्षा प्रवृत्तीचे सत्य त्यांच्यासमोर असते. जो समग्रपणा जीवनात असतो तो कलेत नसतो. नाटककार कानेटकरांनी घटनात्मक सत्य बदलून प्रवृत्तिगत सत्य अधिक ठळक आणि उत्कट केले हे त्यांचे वेगळेपण!’
कानेटकरांच्या व्यावसायिक नाटकांमध्ये ‘बेइमान’ हे नाटक दोन कारणांसाठी लक्षवेधी ठरले. कानेटकरांनी या नाटय़लेखनासाठी नाटककार ज्याँ अनुई यांच्या ‘बेकेट’ नाटकाचा आराखडा स्थूलरूपाने समोर ठेवला. अनुई यांच्या नाटकातला संघर्ष राजसत्ता आणि धर्मसत्ता असा आहे. भारतीय जीवनात अशी पार्श्वभूमी शोधावी लागते. कानेटकरांनी नाटय़ विषयातील तपशिलांची दिशा बदलून मराठी जीवनाशी जुळणारा नाटय़आराखडा तयार केला. दोन मित्रांच्या स्नेहभावात मालक आणि मजूर यांच्या संघर्षावर कानेटकरांनी हे नाटक उभे केले. ‘अखेरचा सवाल’ आणि नंतर आलेले ‘अश्रूंची झाली फुले’ ही कानेटकरांची नाटके अतिशय लोकप्रिय ठरली. ‘माणसाला डंख मातीचा, एक रूप अनेक रंग, गाठ आहे माझ्याशी, गोष्ट जन्मांतरीची’ अशी काही नाटके कानेटकरांनी प्रेक्षक आणि नाटय़निर्मात्यांच्या मागणीनुसार लिहिली. त्याचे प्रयोग नाटकाच्या ताकदीनुसार होत राहिले. ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकात परस्परांवर प्रेम करणाऱया पती-पत्नींच्या सांसारिक जीवनातील ‘निपुत्रिकत्व’ हा नाजूक आणि हळवा विषय असूनही कानेटकरांनी हा विषय खेळकरपणे हाताळला.
कोणत्याही प्रयोगशील नाटय़लेखन करणाऱया लेखकाला जसे विविध विषय आवाहन करीत असतात तसेच वेगवेगळ्या आविष्कार पद्धतीही वापरण्याचा मोह होत असतो. कानेटकरही त्याला अपवाद नव्हते. त्यांनाही गंभीर विषय-आशय व्यक्त करण्याबरोबरच विनोद, प्रहसन, विडंबन, अद्भुतता यांचा उपयोग करून नाटय़लेखन करण्याची आवड होती. ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक विनोद, विडंबन या अंगाने प्रयोगात रंगतदार होत गेले.
या मनस्वी नाटककाराच्या सर्जनयात्रेमुळे मराठी साहित्यातील नाटकांचे दालन समृद्ध झाले. कल्पना आणि वास्तव यांच्या मनोहारी खेळात आपणच निर्माण केलेल्या रंगमंचावर आपल्याच लेखणीतून साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या आधारे जीवनाचा अन्वयार्थ लावताना मराठी रंगभूमीला आणि नाटय़रसिकांना समृद्ध करणाऱया या प्रतिभासंपन्न नाटककाराला विनम्र अभिवादन.
(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)



























































