मनतरंग :- मी नाही जा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

(Oppositional behavior) अशा वर्तनाची मुलं हाताळण्यासाठी कमालीचा संयम लागतो. कारण त्यांच्यातला राग आणि विद्रोह समजून घेणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. त्यांच्यामधील विद्रोह हा मुख्य करून ‘माझ्या आई-बाबांना मी आवडत नाही. त्यांचं माझ्यावर प्रेम नाही. त्यांच्यासाठी कायम मी मस्तीखोर आहे. तर मी का सुधारू?’ या नैराश्यातून आलेला असतो. त्यामुळे इतरांना त्रास देणं, मस्ती करणं हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे असतो ज्यायोगे त्यांच्याकडे त्यांचे आईवडील तसेच शिक्षक लक्ष देतील. म्हणूनच कुठल्या तरी मार्गाने ही मुलं स्वतःकडे इतरांचं लक्ष वेधून घेतात.

मॅडम, कुठल्या तरी चांगल्या बार्ंडग स्कूलचं नाव सुचवता का? आम्हाला आमच्या सोनियाला (नाव बदलले आहे) तिथे पाठवायचं आहे. खूप त्रास देते ही पोर. रोजच्या हिच्याबद्दल तक्रारी आहेत शाळेकडून.’ समोर बसलेले त्रासिक आई-बाबा त्यांच्या मुलीचा तक्रारींचा न संपणारा पाढाच वाचत होते.

सोनियाविषयीच्या त्यांच्या तक्रारी वरवर पाहता साधारण होत्या. जसं की, सांगितलेलं ऐकायचं नाही, अभ्यास करायचा नाही, इतर मुलांना त्रास द्यायचा. सोनिया शाळेत जशी मस्तीखोर होती तशीच घरीसुद्धा होती असं तिच्या आईवडिलांचं म्हणणं होतं. त्यामुळेच ते जास्त कंटाळले होते. ‘आम्ही हिच्यापुढे हात टेकले आहेत. आपण जे सांगू त्याच्या उलटच ती वागणार आणि अंगावर येणार. चांगलं सांगितलं तर कानावर हात ठेवेल आणि आमच्यासमोरून पळून जाईल. आता फक्त दहा वर्षांची आहे ही. पण अशी अंगात मस्ती आणि हेकेखोरपणा आहे हिच्या की त्याचं नावच ते.’ आईला हे सगळं सांगताना खूप वाईट वाटत होतं.

सोनियाचं बेशिस्तपणे वागणं, उलट बोलणं हे निश्चितच वाढलेलं होतं आणि त्याचं रूपांतर हे हळूहळू Oppositional Defiant Behavior (विरोधी वागणे) या वर्तनीय समस्येत होत होतं. त्यामुळेच त्याची तत्काळ दखल घेणं गरजेचं होतं.

ही समस्या काही लहान मुलांमध्ये आणि वयात येणाऱया मुलांमध्ये तसेच मुलींमध्येही असू शकते. याची ठळक वैशिष्टय़े अशी की-

  • कायम चिडचिड करणे.
  • मोठय़ा व्यक्तीने सांगितल्याच्या उलट वागणे किंवा बोलणे.
  • विद्रोही वृत्ती (साधारण नियम न पाळणे)
  • कधीकधी विध्वंसक वृत्ती
  • कोणाचेही न ऐकणे
  • वाटेल तसे बोलणे
  • इतरांना त्रास देणे

या समस्येचं मूळ शारीरिक जडणघडण आणि आजूबाजूचं वातावरण (मुख्यतः घरातलं) यामध्ये सापडतं. जर मुलाचे आई-वडील किंवा दोघांपैकी एक जरी कठोर शिस्तीचा आणि आपलं तेच खरं करणारा पालक असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम हा मुलाच्या मानसिकतेवर होऊ शकतो.

या आणि इतरही सर्व गोष्टी सोनियाच्या पालकांना समजावून सांगण्यात आल्या आणि तिचे समुपदेशन सुरू झाले. सोनिया सुरुवातीचे काही दिवस फक्त ‘शाळा आणि आई-बाबांपासून सुटका’ म्हणून समुपदेशनाला येत होती. कायम येताना तिच्याकडेही तिच्या आई-बाबांबद्दल आणि शाळेबद्दल तक्रारी होत्या.

सोनियाला वर्गातील मुलांचा राग होता. त्याचं कारण म्हणजे कायम तिला तिच्या वडिलांवरून डिवचलं जात होतं. तिचे वडील हे पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यावरूनच तिला नेहमी त्यांच्या पदावरून डिवचलं गेलं होतं. तिचे वडील तसं पाहता मायाळू होते, पण डय़ुटीमुळे त्यांना घरी जास्त वेळ देता येत नसे. आणि घरी आल्यावर जेव्हा ते सोनियाबद्दलच्या तक्रारी ऐकत तेव्हा त्यांचा पारा चढत असे.

तिची आईही एका शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे सोनियाच्या घरचं वातावरण तसं पाहायला गेलं तर थोडंफार शिस्तीचं होतं. ‘माझे आईबाबा फक्त ओरडतात. मला खेळायला देत नाहीत. अभ्यास करायला लावतात. मला बाहेर फिरायला नेत नाहीत. मी का त्यांचं ऐकू? मी खेळणारच.’ हा निश्चयवजा विचार तिचा पक्का होत चालला होता.

तिच्या या अशा वर्तनामागे अजून एक पैलू होता. तो म्हणजे तिच्यामध्ये असलेली अधिकची ऊर्जा जी मस्तीमध्ये वाया जात होती.

सोनिया ही अशीच काहीशी होती. पण तिचा हा खोडय़ा काढण्याचा आणि मस्तीखोर स्वभाव हा बराचसा प्रामाणिक होता. तिच्या या अशा वागण्यातून ती तिची बाजू मांडायचा प्रयत्न (मीसुध्दा दखलपात्र आहे. माझ्याकडे लक्ष द्या) करत होती. पण तिच्या बालसुलभ वयाला योग्य मार्ग सापडत नव्हता. म्हणूनच तिची असहाय्यता तिला चिडचिड आणि विद्रोहाकडे घेऊन जात होती.

समुपदेशनाच्या प्रक्रियेत सोनिया तसेच तिच्या पालकांना सामील करून घेण्यात आले आणि तिच्या पालकांना मुख्यत्वेकरून ‘तिचा विनाशर्त स्वीकार’ कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. सोनियाला तिच्या वयाला साजेशा अशा काही जबाबदाऱयाही सांगण्यात आल्या (आईला घरकामात मदत). तिच्या शिक्षकांनाही याबद्दल कल्पना देण्यात आली. तिच्या शिक्षकांनीही मग शाळेत तिला काही वर्गात जबाबदाऱया दिल्या (फळा पुसणे, प्रॅक्टिकल्सच्या वह्या नेणे-आणणे). या जबाबदाऱयांच्या जोडीला तिला कायम कौतुकाची थाप देण्यात आली. सुदैवाने सोनियाला सर्वतोपरी सहकार्य मिळाले.

आज, सोनिया बरीचशी बदलली आहे. तिची मस्ती आणि राग हा बराचसा गेलेला आहे. आता ती वर्गात इतर मुलांमध्ये चांगलीच मिसळून राहते. तासाला शांत असते आणि अभ्यासही करते. घरीसुध्दा तिचे वर्तन व्यवस्थित आहे. घरीही आता तिच्या शांतता आहे. तिचे आई-वडील तिला आठवडय़ातून एकदा बाहेर नित्यनेमाने फिरायला घेऊन जातात. सोनियामधली विद्रोही वृत्ती जाऊन आता तिच्यात सहकार्य आणि आपले म्हणणे योग्य त्या मार्गाने समजवणे ही वृत्ती आली आहे.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

[email protected]