
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सातारा तालुक्यातील निनाम पाडळी येथील युवकास अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवेंद्र राजेंद्र ढाणे (मूळ रा. पाडळी, सध्या रा. सातारा) असे या युवकाचे नाव आहे.
संबंधित अल्पवयीन मुलगा हा आपल्या आईसोबत राहतो. या मुलाच्या भावावर गेल्या वर्षी एक गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी शिवेंद्रचे वडील जामीन झाले होते. त्यांनी जामिनासाठी पाच हजार रुपये भरले होते. वडिलांनी जामिनासाठी भरलेल्या पाच हजार रुपयांऐवजी नऊ हजार रुपये परत द्यावे, यासाठी शिवेंद्र हा संबंधित कुटुंबाला वारंवार धमकी देत होता. सकाळी मुलाची आई रानात गेली होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवेंद्र हा त्यांच्या घरी आला. त्याने पुन्हा पैशांची मागणी केली.
यावेळी त्याने मुलाच्या आईला फोन करून जामिनासाठी भरलेले पैसे परत दे, नाहीतर तुझ्या मुलाला उचलून त्याला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून सातारा येथील शिवराज पेट्रोलपंपालगत असलेल्या डोंगरातील झाडीत नेले. तेथे त्याला मारहाण केली. त्यानंतर शिवेंद्रने त्याला करंजे (सातारा) येथे आणले. तेथेही त्याला मारहाण करून त्याच्या आईकडे फोनवरून पुन्हा पैशांची मागणी केली.
यावेळी सायंकाळी उशिरा मुलाने शिवेंद्रच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत शिवराज पेट्रोलपंप गाठला. तेथून त्याने आपल्या चुलत भावाला फोन करून सर्व घटना सांगितली. चुलत भावाने तत्काळ त्याला तेथून घेऊन बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला. रात्री उशिरा शिवेंद्रच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी पोलीस जवान दादा स्वामी, प्रशांत मोरे यांना संशयिताला तत्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. केवळ चार तासांतच पोलिसांनी खिंडवाडी (ता. सातारा) येथून राहत्या घरातून संशयित शिवेंद्रला अटक केली. घटनेचा पुढील तपास डॉ. सागर वाघ करीत आहेत.























































